Cleaning of rivers will start before summer : तिन्ही नद्यांमध्ये ७ फेब्रुवारीपासून काम; पावसाळ्यात मिळणार दिलासा
Nagpur नागपूर शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा तिनही नद्यांच्या सफाई अभियानाला शुक्रवार ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पावसाळापूर्व तयारीच्या दृष्टीने तिन्ही नद्यांच्या सफाई अभियानाकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये नागपूरला अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळे आयुक्तांनी धास्ती घेऊन उन्हाळ्यापूर्वीच कामाला सुरुवात केली आहे.
नदी आणि नाले सफाईच्या अनुषंगाने मनपा आयुक्तांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. मनपा आयुक्त सभाकक्षातील बैठकीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, उपायुक्त विजय देशमुख, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह सर्व झोनचे कार्यकारी अभियंता आणि झोनल अधिकारी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेद्वारे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी आणि नाल्यांची सफाई करण्यात येते. नद्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरीता सुरळीत प्रवाह करण्यात येतो. शहरातील नाग नदीची लांबी १६.५८ किमी, पिवळी नदीची लांबी १७.४२ किमी आणि पोहरा नदीची लांबी १५.१७ किमी आहे. यात ७ फेब्रुवारीपासून सुरु होत असलेल्या नदी स्वच्छता अभियानासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आले आहे.
त्यानुसार अभियानात सुरुवातीला नाग नदीच्या पात्राची अंबाझरी तलाव ते पंचशील चौक, पंचशील चौक ते अशोक चौक आणि सेंट झेव्हिअर स्कूल ते पारडी उड्डाणपूल या तीन टप्प्यांत सफाई करण्यात येणार आहे. पिवळी नदीच्या पात्राची गोरेवाडा तलाव ते नारा दहन घाट आणि नारा घाट ते एसटीपी वांजरा या दोन टप्प्यात सफाई केली जाईल. पोहरा नदीची सहकार नगर घाट ते बेलतरोडी पूल आणि बेलतरोडी पूल ते हुडकेश्वर पिपळा फाटा पूल या दोन टप्प्यात सफाई करण्यात येणार आहे.
७ फेब्रुवारीपासून अभियानात सुरुवातीला तीनही नद्यांच्या सात टप्प्यांची सफाई होणार आहे. यासाठी ७ पोकलेन लावण्यात येणार आहेत. नदी सफाईचे कार्य व्यवस्थित व्हावे याकडे प्राधान्याने लक्ष देणे तसेच स्वछता कार्य जलदगतीने व्हावे यासाठी आवश्यकता भासल्यास आणखी मशीनरी लावण्यात याव्यात. तसेच नदी आणि नाले सफाई करताना गाळ नदी पात्रात परत जाणार नाही याची काळजी घेण्याचेही निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.