Congress’s statewide agitation for farmers’ issues : महायुती सरकारच्या विरोधात एल्गार; विधीमंडळाच्या बाहेरही आक्रमक पवित्रा
Mumbai कालपर्यंत शस्त्र टाकून बसलेल्या काँग्रेसला अखेर जाग आली आहे. केवळ घटनांवर प्रतिक्रिया देण्यात व्यस्त असलेले काँग्रेसचे नेते आज शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरले आहेत. विधीमंडळ परिसरात मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर आता राज्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसने महायुती सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ Harshawardhan Sapkal यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आज, दि. ४ मार्चला आंदोलन करण्यात आले. महायुती सरकार शेतकरीविरोधी आहे निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. झोपी गेलेल्या भाजपा युती सरकारला जागे करण्याची गरज आहे, असं सपकाळ यांनी म्हटलं आहे.
Harshawardhan Sapkal : फडणवीस, पवारांनी सत्तेत राहण्याचा अधिकार गमावला
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, रास्त वीज पुरवठा द्यावा, पिक विमा व कृषी अवजारांवरील जीएसटी रद्द करावी, शेतकऱ्यांचे ठिबक अनुदान तात्काळ मिळावे, सोयाबीन हमीभावातील फरक, सोलार पंप तात्काळ देण्यात यावे, शेतमाला हमीभाव द्यावा, दूध दरवाढ द्यावी, या मागण्यांसाठी काँग्रेसने आंदोलन पुकारले आहे.
लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी व खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथे खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वात सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. नापिकी आणि शेतमालाला हमीभाव नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकरी आणि महिलांना सुरक्षिततेची हमी द्या नाहीतर सरकार विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
बुलढाणा येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्त्वाखाली एल्गार मोर्चात शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपने निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे या अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्ज माफ करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. विरोधात धाराशिव येथे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्यात आले.