Congress maintained supremacy in Salekasa : पंचायत समिती निवडणूक; सालेसकामध्ये काँग्रेसने राखले वर्चस्व
Gondia अर्जुनी मोरगावचा अपवाद वगळला तर गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडणुकीत भाजपचाच डंका राहिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे (अजित पवार) समीकरण कायम राहिले. त्यामुळे सभापती आणि उपसभापती पदावर दोन्ही पक्षांनी मोहोर उमटवली आहे. सोमवार, दि. २० जानेवारीला पंचायत समिती सभापती व उपसाभपती पदासाठी निवडणूक झाली.
अर्जुनी मोरगावमध्ये भाजपचे बंडखोर संदीप कापगते यांनी उमेदवारी दाखल केली नसती तर तिथे उपसभापतीपद भाजपकडे आले असते. मात्र, हा अपवाद वगळला तर देवरी, गोंदिया, तिरोडा, सडय अर्जुनी या पंचायत समितींमध्ये भाजप-राष्ट्रवादीने वर्चस्व राखले आहे. तर काही ठिकाणी सदस्यसंख्या नसल्यामुळे काँग्रेसने उमेदवारीच दाखल केली नाही. सालेकसा पंचायत समिती अपवाद ठरली आहे. याठिकाणी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
Panchayat Samiti Election : भाजपच्या बंडखोराने घेतली काँग्रेसची मदत
सडक अर्जुनी – भाजपचे डव्वा (पळसगाव) क्षेत्राचे सदस्य चेतन वडगाये यांची सभापती तर उपसभापतीपदी निशा काशीवार यांची निवड करण्यात आली आहे. येथील पंचायत समितीचे सभापतीपद हे अनुसूचित जमातीकरिता राखीव होते.
सालेकसा – सभापतिपदी वीणा कटरे तर उपसभापतिपदी जितेंद्र बल्हारे यांची निवड करण्यात आली. दोघांनाही प्रत्येकी सहा मते मिळाली तर त्यांच्याविरोधात भाजपच्या उमेदवारांना प्रत्येकी दोन मतांवर समाधान मानावे लागले. सालेकसा पंचायत समितीत एकूण आठ सदस्य आहेत. यापैकी काँग्रेसचे सहा तर भाजपच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत सभापतिपद एससी राखीव असल्याने प्रमिला गणवीर यांची सभापतिपदी तर उपसभापतिपदी संतोष बोहरे यांची निवड करण्यात आली.
आमगाव – भाजपच्या तिगाव क्षेत्राच्या पं.स. सदस्य योगीता पुंड यांची निवड सभापती तर उपसभापतीपदी ठाणा क्षेत्राच्या पं.स. सदस्या सुनंदा उके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समितीत काँग्रेसकडे संख्या बळ नसल्याने सभापती व उपसभापतीपदासाठी त्यांनी उमेदवार उभे केले नाही. त्यामुळे पुंड व उके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
Politics of District Central Cooperative Bank : बँकेत ‘अविश्वास’ मांडणारेच अविश्वासाच्या घेऱ्यात
देवरी – सभापतिपदी अनिल बिसेन तर उपसभापतीपदी शालिकराम गुरनुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती सभापतिपद सर्वसाधारण निघाले होते. एकूण १० सदस्यीय पंचायत समितीत सहा सदस्य भाजपचे असून चार सदस्य काँग्रेसचे आहेत. सभापती व उपसभापतिपदासाठी काँग्रेसकडून कुणीही अर्ज दाखल केले नाही. यात भाजपचे अनिल बिसेन यांनी सभापती तर शालिकराम गुरनुले यांनी उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु या दोघांव्यतिरिक्त कुणाचेही अर्ज नसल्याने सभापतिपदी अनिल बिसेन तर उपसभापतिपदी शालिकराम गुरनुले यांची बिनविरोध निवड झाली.
गोरेगाव – सभापतिपदी भाजपच्या चित्रकला चौधरी तर उपसभापतिपदी रामेश्वर मारवाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या पंधरा दिवसांपासून गोरेगाव पंचायत समितीच्या सभापतिपदी कोणाची वर्णी लागणार, यावरून तर्कवितर्क लावले जात होते. सभापतिपदी व उपसभापतिपदी वर्णी लागावी, यासाठी काही सदस्यांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली होती. पण सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत चित्रकला चौधरी यांची सभापती म्हणून तर रामेश्वर मारवाडे यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
गोंदिया – सभापतीपदी भाजपचे मुनेश रहांगडाले, तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सदस्य शिवलाल जमरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती सभापतीपदाचे सर्वसाधारण आरक्षण निघाले होते. आमदार विनोद अग्रवाल भाजपवासी झाल्याने त्यांची चावी संघटना देखील भाजपमध्ये विलीन झाली आहे. भाजपचे मुनेश रहांगडाले व उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवलाल जमरे यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात कुणाचाही अर्ज आला नाही.
तिरोडा – सभापतिपदाचे आरक्षण सर्वसाधारण निघाले होते. यात सभापतिपदी भाजपच्या तेजराम सुरजलाल चव्हाण यांची, तर उपसभापतिपदी सुनंदा अनंत पटले यांची बिनविरोध निवड झाली. दोन्ही पदांकरिता एकच उमेदवारी अर्ज असल्याने निवडणूक अधिकारी यांनी त्यांना विजयी घोषित केले आहे.