Sanjay Rauts attack on the role of Congress leaders : काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर संजय राऊतांचा’ टोला
Mumbai: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांच्या विधानांवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता!” असं म्हणत त्यांनी काँग्रेसला ‘लोकशाही वाचवण्याची लढाई समजून घ्या’ असा सल्लाही दिला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आणि राज ठाकरे यांच्या मनसेचा संभाव्य युतीचा विषय चर्चेत आहे. मात्र, यावर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी स्पष्टपणे सांगितल “राज ठाकरे काय, आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही आघाडी करून लढणार नाही.
या भूमिकेला काँग्रेसमधील काही इतर नेत्यांनीही पाठिंबा दिला. त्यानंतर आता संजय राऊत यांनी काँग्रेसला थेट आरसा दाखवत ‘रोखठोक’ प्रत्युत्तर दिलं आहे.”
Funds for MLA : सत्ताधाऱ्यांच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींची ‘खिरापत’
राऊत म्हणाले, “मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये कोणी वेगळी भूमिका घेतली, तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही मित्र पक्षांना अडचणीत आणणारी भूमिका घेणार नाही.”
त्यांनी पुढे म्हटलं, “आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा आहे. मुंबई अडाणीच्या घशात जाऊ नये म्हणून आम्ही लढतो आहोत. हीच ती मुंबई आहे जिच्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली होती. त्यावेळी सर्व पक्ष एकत्र आले होते. काँग्रेसच्या नेत्यांनी हा इतिहास समजून घ्यावा.”
Local body Election : मुंबईत महायुती एकत्र, उर्वरित ठिकाणी स्वतंत्र लढवणार
काँग्रेसच्या नेत्यांच्या विधानांवर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले “बिहारमध्ये काय राज ठाकरे आहेत का? तिथे तेजस्वी यादव आणि काँग्रेस एकत्र असूनही भांडणं सुरू आहेत. मग तिथे राज ठाकरे आहेत का? उद्धव ठाकरे आहेत का? हे सगळं एका दिवसाच्या प्रसिद्धीसाठी बोललं जातं.”
राऊत म्हणाले, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ती मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे. काँग्रेसच्या मराठी नेतृत्वाने या प्रश्नाचं गांभीर्याने चिंतन करावं, असा त्यांनी सल्ला दिला.
संजय राऊत म्हणाले “आम्हाला तर काँग्रेसचाच पंतप्रधान करायचा होता. आम्ही ‘इंडिया ब्लॉक’ निर्माण केला तेव्हा राहुल गांधींनाच पंतप्रधान करायचं ठरवलं होतं. आमचं मन मोठं आहे. काँग्रेस दिल्लीतील सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहे.”
त्यांनी टोला लगावत म्हटलं, “तुम्ही 27 महानगरपालिकांचे महापौर काँग्रेसचे करा, आम्हाला काही अडचण नाही. पण मुंबईचा महापौर मराठी माणसाचा असावा, हे आमचं प्राधान्य आहे. मुंबईवर गेल्या 30 वर्षांत मराठी महापौर राहिला आहे, त्याचं श्रेय शिवसेनेलाच जातं.”
राऊत यांनी पुढे सांगितलं, “आम्हाला काही बोलायचं असेल तर आम्ही राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला यांच्याशी बोलू. सध्या आम्ही 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढत आहोत. त्यात काँग्रेस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि डावे पक्ष हे सर्व सहभागी आहेत.” “ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे. काँग्रेसने हे समजून घ्यायला हवं,” असं राऊत म्हणाले.
_____