Congress wants to avoid mistakes of Assembly elections : चिखलीत आढावा बैठक; संघटना बळकट करण्याचा निर्धार
Buldhana महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार बुलडाणा जिल्ह्यातील तालुका व जिल्हा कार्यकारिण्या नव्याने गठीत करण्याच्या पार्श्वभूमीवर चिखली तालुका व विधानसभा निहाय संघटनात्मक आढावा बैठक नुकतीच चिखली येथे उत्साहात पार पडली. लोकसभेतील यशानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसचा मोठा पराभव झाला. त्यामुळे विधानसभेतील चुका सुधारण्यावर भर देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
या बैठकीला पक्ष निरीक्षक म्हणून राजेंद्रजी राख यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे होते. चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत पक्ष निरीक्षक राजेंद्रजी राख यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने संवाद साधला.
Harshawardhan Sapkal : संविधान घेऊन ऐतिहासिक काळाराम मंदिरात सपकाळांचा प्रवेश !
“पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आवश्यक धोरण, कार्यपद्धती आणि तळागाळातील स्थानिक कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले. “कार्यकर्त्यांचे कार्यबळ अधिक सक्षम करणे, संघटना प्रभावीपणे उभी करणे आणि आगामी काळात काँग्रेसचा झेंडा अधिकाधिक उंचावणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे,” असेही त्यांनी सांगितले.
आढावा बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांशी मुक्त संवाद साधताना राहुलभाऊ बोंद्रे म्हणाले, “सद्यस्थितीत देशाची परिस्थिती अत्यंत बिकट असून, लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांनी सक्षमपणे संविधान रक्षक म्हणून पुढे येणे आवश्यक आहे.”
ते पुढे म्हणाले, “जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाच्या धोरणांची अंमलबजावणी, कार्यकर्त्यांमध्ये एकजूट आणि वैचारिक बळकटी निर्माण करणे ही माझी प्राथमिक जबाबदारी असेल.” यावेळी आगामी राजकीय दिशा, संघटनात्मक बळकटीकरण तसेच स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांवर कार्यकर्त्यांशी सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीमुळे जिल्हाभरातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीमधून मिळालेल्या प्रतिसादामुळे नवीन उर्जा मिळत असल्याचे सांगून, “जनतेच्या समस्या सोडवण्यासोबतच संघटनेच्या बळकटीसाठी मी सदैव कटिबद्ध आहे,” असेही बोंद्रे यांनी स्पष्ट केले.