Contractor Commits Suicide : बेताल शासन, शेतकऱ्यांसारखीच केली कंत्राटदारांची अवस्था, सत्ताधाऱ्यांच्या मनात काय?

Erratic Government policies force contractors to turn farmers : ‘देवा भाऊ पैसे द्या, तुमचं जमलं आता आमचंही जमवा..’, म्हणत केले होते आंदोलन

Nagpur : कंत्राटदार सरकारची कामे करत असतात. ही कामे करताना त्यांना यंत्रसामग्री, मजूर आदींची व्यवस्था आधी करावी लागते. त्यासाठी पैशांची जुळवाजुळव करताना त्यांना उसणवारीसुद्धा करावी लागते. सामान्यपणे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना केलेल्या कामाचे पैसे मिळतात. त्यातून कर्ज, उसणवार आदींची परतफेड करतात. हीच कंत्राटदारांच्या कामाची पद्धत आहे. पण या सरकारच्या मनात काय आहे, हेच राज्याला कळेनासे झाले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर विभागांतील बांधकामांची जवळपास ९० हजार कोटीं रुपयांची कामे पूर्ण केल्यानंतरही शासनाने कंत्राटदारांची बिले काढलेली नाहीत. राज्यातील कंत्राटदार गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडून तणावग्रस्त झालेले आहेत. याच तणावातून त्यांना विविध आजार जडत आहेत. जे कंत्राटदार हा तणाव सहन करू शकले नाहीत. त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. काही महिन्यांपूर्वी सांगली येथील एका कंत्राटदाराने आत्महत्या केली होती. काल नागपुरात राज नगरमध्ये राहणाऱ्या ५० वर्षीय पी.व्ही. उर्फ मुन्ना वर्मा या कंत्राटदाराने कामांचे पैसे न मिळाल्याने आत्महत्या केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचेही सत्र असेच सुरू झाले होते. त्यामुळे आता आमचीही स्थिती शेतकऱ्यांसारखीच करायची आहे का, असा संतप्त सवाल कंत्राटदारांनी केला आहे.

Mudhoji Raje Bhosale : आरक्षणाची भानगड संपली पाहिजे !

मुन्ना वर्मा यांचे शासनाकडे जवळपास १०० कोटी रुपये थकीत असल्याची माहिती त्यांच्या एका सहकारी कंत्राटदाराने ‘सत्तावेध’ला दिली. गेल्या आठ दिवसांपासून त्यांचे कुटुंबीय काही कामानिमित्त हैद्राबादला गेले होते. आधीच बिलांचे पैसै न मिळाल्याचा तणाव आणि त्यात घरी कुणी नसल्यामुळे आलेले एकटेपणे यांमुळे वर्मा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे सांगण्यात आले. आता राज्यातील कंत्राटदारांचा प्रश्न गंभीर झालेला आहे.

देवा भाऊ पैसे द्या..
सरकारने सार्वजनिक बांधकाम विभाग, जलजीवन मिशन आदी विविध योजनांची कामे करवून घेतली. त्यासाठी घरदार, दागिने गहाण ठेवले. जीएसटीची रक्कमही स्वतःच भरली. पण कामे पूर्ण केल्यावरही सरकारने पैसे न दिल्यामुळे कंत्राटदार देशोधडीला लागले आहेत. बिलाचे पैसे मिळण्यासाठी कंत्राटदारांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे शहर असलेल्या नागपुरातील संविधान चौकात भिक मांगो आंदोलन केले.

Maratha Agitation : जरांगे पलटले, म्हणे.. आता ज्यांची गॅझेटमध्ये नोंद आहे, त्यांना आरक्षण द्या !

‘देवा भाऊ पैसे द्या, तुमचं जमलं आता आमचंही जमवा..’, असे म्हणत हक्काचे पैसे मिळण्यासाठी याचना केली. पण त्यानंतरही सरकारला पाझर फुटला नाही अन् मुन्ना वर्मा यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांप्रमाणेच आमचीही स्थिती करायची आहे का, असा सवाल करत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटना आता संतापली आहे. हा संताप रस्त्यावर उतरण्यापूर्वी सरकारने कंत्राटरांना त्यांचे पैसे द्यावे, ही माफक अपेक्षा.

  • अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी)

    अमरावती विद्यापीठातून पत्रकारीतेची पदवी. २६ वर्षांपासून पत्रकारीतेमध्ये कार्यरत. सन २००० पासून लोकमत आणि सकाळ वृत्तपत्र समुहामध्ये विविध पदांवर कार्य केलेले आहे. दैनिक सकाळच्या सरकारनामा या वेब पोर्टलसाठी राजकीय प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.