Mahavikas Aghadi and BJP face to face : महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने
Mumbai : ’मत चोरीप्रकरणात निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांनी आज मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ आयोजित केला आहे. महाविकास आघाडी, मनसे आणि अन्य विरोधी पक्षांचा हा संयुक्त मोर्चा असून, फॅशन स्ट्रीटवरून सुरुवात होऊन तो महापालिकेकडे वळणार आहे. त्यानंतर या मोर्चाचं सभेत रूपांतर होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मुंबईत आज सकाळपासून मोठी हालचाल पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या मोर्चाविरोधात भाजपही मैदानात उतरले आहे. भाजपकडून आज मुंबईत ‘मुक आंदोलन’ आयोजित करण्यात आलं असून, गिरगाव चौपाटी येथील टिळक उद्यानासमोर हे आंदोलन पार पडणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच काही आमदार सहभागी होणार आहेत.
भाजपने या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या “दुटप्पी राजकारणाविरोधात” असा स्वरूप दिलं आहे. पक्षाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला तेव्हा सर्व काही योग्य वाटलं, परंतु पराभव झाल्यावर निवडणूक आयोग, मतदार यादी आणि यंत्रणांवर शंका उपस्थित करणं योग्य नाही. या भूमिकेसाठीच भाजपकडून दुपारी १ वाजता शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
Loan waiver : बिनव्याजी कर्ज मिळतंय, मग ते वेळेवर फेडायची सवय लावा !
रवींद्र चव्हाण, अमित साटम आणि मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन ‘संविधानिक संस्थांवर टीका करणे ही विरोधकांची सवय झाली आहे’ या संदेशावर आधारित असेल. भाजपने हे आंदोलन पूर्णपणे शांत आणि ‘मुक’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून पक्षाच्या भूमिकेला गांभीर्य मिळेल आणि जनतेसमोर शांत प्रतिकाराचा संदेश जाईल.
Anil Deshmukh : मतचोरी आणि कर्जमाफी, अनिल देशमुखांचा सरकारवर प्रहार !
दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांच्या मोर्चावर टीका करताना म्हटलं की, “लोकशाहीमध्ये आंदोलनाचा अधिकार सर्वांना आहे, पण काही आंदोलनं जनहितासाठी तर काही केवळ स्वहितासाठी असतात. आजचा हा मोर्चा हा निश्चितच स्वार्थासाठी काढलेला आहे. संविधानिक संस्थांवर शंका घेऊन काही साध्य होणार नाही. निवडणुकीनंतर निकाल लागल्यावर असे मोर्चे का काढले नाहीत, हा प्रश्न जनता विचारेल,” असं त्यांनी म्हटलं.
Irregularities in Voter Lists : मृत्यूनंतरही पंधरा वर्षे मतदार यादीत नाव
नार्वेकर पुढे म्हणाले, “सभागृहात किंवा संविधानिक व्यासपीठावर विषय मांडून तोडगा काढणं योग्य ठरतं. पण खोटा नॅरेटिव्ह निर्माण करण्यासाठी जनता असुविधेत टाकणं चुकीचं आहे. जनता त्याचं उत्तर निवडणुकीत देईल.”
मुंबईतील या दोन परस्परविरोधी आंदोलनांमुळे आज संपूर्ण शहरात मोठी राजकीय चढाओढ सुरू असून, प्रशासनाने दोन्ही कार्यक्रमांसाठी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. ‘सत्याचा मोर्चा’ आणि ‘मुक आंदोलन’ — या दोन आंदोलनांमुळे आज मुंबईचं राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे.
______








