Breaking

Cooperative credit society : ८० कोटी रुपयांचे बोगस वाटप, वणीतील रंगनाथ स्वामी पतसंस्थेत चाललंय तरी काय ?

Whats going on in Ranganath Swami Patsanstha in Wani of Yavatmal District : उच्च न्यायालयाने दिले स्पेशल ऑडीटचे आदेश, सहकार आयुक्तांना मागितले उत्तर

Nagpur : यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे जाळे महाराष्ट्रभर पसरलेले आहे. सद्यस्थितीत या पतसंस्थेची अवस्था डबघाईस येत आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. पतसंस्थेने १०० कोटी रुपयांचे बोगस कर्ज वाटप केल्याचा गंभीर आरोप याचिकाकर्ते अमोल पुरूषोत्तम नावडे यांनी केला आहे.

याचिकेमध्ये रंगनाथ स्वामी पतसंस्थेसह राज्याचे सहकार सचिव, सहकार आयुक्त, लेखा परीक्षक, जिल्हा निबंधकांना पार्टी करण्यात आले आहे. २८ एप्रिल रोजी न्यायालयाने स्पेशल ऑडीट संदर्भात आदेश काढला आहे. त्यामध्ये सहकार आयुक्त व जिल्हा लेखा परीक्षकांना उत्तर मागितले आहे. ‘रंगनाथ स्वामी’च्या सर्वसामान्य ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी धोक्यात आल्याचे सद्यस्थितीत दिसत आहे.

‘रंगनाथ स्वामी’चे लेखापरीक्षण करण्यासाठी सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था पुणे यांनी ३० जानेवारी २०२४ रोजी अमरावती येथील जिल्हा विशेष लेखापरीक्षकांना आदेश दिले होते. ऑडीट झाल्याच्या दिवसापासून ९० दिवसांच्या आत लेखापरीक्षण करण्याच्या सूचना आदेशात देण्यात आल्या होत्या. पण वर्षभराचा कालावधी उलटूनही ‘रंगनाथ स्वामी’चे ऑडिट पूर्णत्वास नेण्याचा मुहूर्त गवसला नाही. त्यामुळे अमोल पुरूषोत्तम नावडे यांनी सभासद, ठेवीदारांचे हित लक्षात घेत नागपूर येथील उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

India – Pakistan : युद्ध थांबले, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती !

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या माध्यमातून नावडे यांनी रंगनाथ स्वामी पतसंस्थेवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचे पुरावेसुद्धा त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या नोटिसनंतर संचालक मंडळाची झोप उडाली आहे. सहकार अधिनियमाची ऐसीतैसी केल्याचे याचिकेत म्हटले आहे. ८० नातेवाईक आणि मित्रपरिवाराला प्रत्येकी १ कोटी याप्रमाणे ८० कोटी रुपयांचे बोगस कर्जवाटप करण्यात आल्याचा गौप्यस्फोटही नावडे यांनी केला आहे.

MLA Sulbha Khodke : एनएचएआय अधिकाऱ्याचा मनमानी कारभार, आमदारांचा संताप

केवळ कर्ज वितरणातच नाही तर स्थावर मालमत्ता खरेदीतही मोठा घोटाळा झाला असल्याचे याचिकेत नमूद आहे. एका मालमत्तेमध्ये विक्रीपत्रावर ५० लाख रुपये बाजारमूल्य दाखवले आहे, जे रेडीरेकनरपेक्षा सहापट जास्त आहे. पंतसंस्थेच्या ताब्यात असलेली जागा रिकामी पडून आहे. यामध्ये ३ कोटी रुपयांचा निधी वाया गेला आहे. पतसंस्थेने संदर्भात इमारतीच्या मालकासाबोत १६ लाख रुपयांचे रोख व्यवहार करून मोठी अनियमितता केल्याचाही आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

Local Body Elections : दोन वर्षांपूर्वी केलेली आरक्षण सोडत रद्द होणार?

‘रंगनाथ स्वामी’वर प्रशासक का नियुक्त करू नये, असा प्रश्न नावडे यांनी केला आहे. संचालक मंडळ, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर त्यांनी तोफ डागली आहे. याचिकेमध्ये १७ गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संस्थेचे अध्यक्ष ‘व्हाईट कॉलर’ आहेत आणि संचालक मंडळाच्या संगनमताने भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप याचिकाकर्ते नावडे यांनी केला आहे. नावडे यांच्यातर्फे अॅड. एस.डी. सिरपूरकर युक्तीवाद करत आहेत.

  • अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी)

    अमरावती विद्यापीठातून पत्रकारीतेची पदवी. २६ वर्षांपासून पत्रकारीतेमध्ये कार्यरत. सन २००० पासून लोकमत आणि सकाळ वृत्तपत्र समुहामध्ये विविध पदांवर कार्य केलेले आहे. दैनिक सकाळच्या सरकारनामा या वेब पोर्टलसाठी राजकीय प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.