Even the Party Workers Can’t Recall Kishor Jorgewar’s Work : पोशाख आणि संवादातील शब्दप्रयोगही सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखेच
Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्याच्या आणि एकुणच महाराष्ट्राच्या राजकारणात सुधीर मुनगंटीवार यांचे एक आगळेवेगळे मानाचे स्थान आहे. जनतेच्या विषयांप्रति असलेली त्यांची संवेदनशीलता, विकासाची दृरदृष्टी, प्रसंगी आक्रमक होण्याचा स्वभाव अनेकांना भुरळ घालतो. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात तरी त्यांना कुणी मात देऊ शकेल, असे वाटत नाही. गेल्यावर्षी आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करून तसा प्रयत्न केला. पण जोरगेवारांना त्यात अद्यापही यश आले नाही. त्यामुळे ते चक्क आता सुधीरभाऊंची कॉपी करायला लागले आहेत आणि ही चर्चा चंद्रपुरात सध्या जोरावर आहे.
भाजपचे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यशैलीची अक्षरशः नक्कल करण्याचा प्रयत्न चालवला असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. सभागृहात बोलण्याची पद्धत, सार्वजनिक कार्यक्रमांतील भाषणाची शैली, अगदी पोशाख आणि संवादातील शब्दप्रयोगही ते मुनगंटीवार यांच्याच धाटणीचे करताना दिसतात. येवढेच काय तर सुधीरभाऊंसारखाच वाहनांचा ताफा घेऊन हल्ली ते फिरायला लागले आहेत आणि हे दुसरे-तिसरे कुणी म्हणत नाही, तर जोरगेवार यांचेच कार्यकर्ते खासगीत बोलताना आढळतात. येवढेच काय, तर जोरगेवारांनी केलेले एकही काम त्यांच्याच कार्यकर्त्यांना आठवत नाही. विचारलं तर ‘फाईल बघून सांगतो..’, येवढेच उत्तर त्यांच्याकडून मिळते.
Cidco Land Scam : वनविभागाचे कबुलीपत्र, रोहित पवारांच्या आरोपांना दुजोरा
‘कॉपी मारून विकास होत नाही’, असे जोरगेवार यांचेच कार्यकर्ते बोलत असल्याचे सूत्र सांगतात. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी केलेले नियोजन, शासकीय यंत्रणेशी असलेला त्यांचा सुसंवाद आणि त्यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वशैलीमुळे त्यांना राज्याच्या राजकारणात, समाजकारणात एक वेगळा दर्जा मिळालेला आहे. मात्र तीच पद्धत कॉपी करून दुसऱ्या कुण्या नेत्याला स्वतःचे व्यक्तिमत्व घडवता येत नाही, असा सूर आता भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये ऐकू यायला लागला आहे.
प्रत्येक नेत्याकडे स्वतःचा ब्रॅंड आणि ओळख असते. ती व्यक्तिमत्वातून, अनुभवातून निर्माण होते, नक्कल मारून नव्हे. भाजपच्या गोटातही या विषयावर कुजबूज सुरू झाली आहे. नेतृत्व म्हणजे आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि जनतेशी थेट नाळ जोडणे. फक्त प्रभावशाली लोकांच्या पद्धतीची नक्कल मारणे नव्हे, अशी चर्चा आता भाजपच्याही गोटात होते आहे. मुनगंटीवारांची कॉपी जोरगेवारांनी खुशाल मारावी, पण त्यांच्यासारखे कामही करून दाखवावे, असे लोक बोलत आहेत.
Babanrao Taywade : राजकीय पक्षांनी बोगस ओबीसींना उमेदवारी देऊ नये !
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून जोरगेवार यांनी २०१९मध्ये निवडणूक लढवली, तेव्हा जनतेला २०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा त्यांनी खूप गाजावाजा केला, पण आजतागायत ते आपले वचन पाळू शकले नाही. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपवासी झाले आणि पुन्हा आमदार झाले. आता तर त्यांना त्या आश्वासनाचा विसर पडला आहे. दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर जवळपास वर्ष उलटून गेले तरी त्यांच्या कामाची चुणूक काही दिसली नाही. एखाद्या तरी लोकोपयोगी कामासाठी त्यांनी निधी आणल्याचे ऐकिवात नाही. या सर्व गोष्टींचे त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. फक्त नक्कल करून मोठे होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा भाजपने दिलेल्या संधीचे सोने करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे, असे सल्ले त्यांना भाजप कार्यकर्त्यांकडून दिले जात आहेत.
Defender car case : एड्सग्रस्तांच्या अनुदानाचा गैरवापर केल्याचा गंभीर दावा
भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून या प्रकरणावर रोचक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की,मुनगंटीवार यांची कॉपी त्यांनी केली तरी हरकत नाही, पण सुधीरभाऊंसारखं होणं शक्य नाही. त्याऐवजी त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करावं. मोठं काम करून, चंद्रपूरच्या विकासासाठी एखादा भव्य प्रकल्प आणून त्यांनी आपलं आणि पक्षाचं नाव उंचावावं. फक्त मोठ्या नेत्यांसोबत फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्यापेक्षा प्रत्यक्ष लोकांच्या हिताचं काम केल्यासच त्यांचं नेतृत्व मान्यता मिळवू शकेल. अन्यथा ‘कॉपी बहादूर’ ही पदवी भविष्यात त्यांच्याच नावाशी जोडली जाईल.








