Cousin’s murder in the weekly market : एकाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी; लोकांमध्ये दहशत
Khamgaon आठवडी बाजारातील खुनाच्या घटनेने सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. चुलतभावावर झालेल्या हल्ल्यामुळे घटनेची चर्चा पंचक्रोशीत होत आहे. यात एकाचा मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी आहे.
जिगाव सिंचन प्रकल्पात गेलेल्या शेतजमिनीच्या मोबदल्याच्या वादातून एकाने चुलतभावाचा खून केला. ही घटना माटरगाव येथील आठवडी बाजारात १७ जानेवारी रोजी घडली. मृतकाची पत्नी, साळी यांच्यावरही आरोपीने हल्ला केला. त्या गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी खामगावातील खासगी रूग्णालयात आणण्यात आले. साळीची प्रकृती गंभीर असल्याने अकोला येथे पाठवण्यात आले.
Anil Deshmukh : पालकमंत्री ठरवायला आंतरराष्ट्रीय नेत्यांशी चर्चा करणार का?
याप्रकरणातील आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. जलंब ठाण्याचे पथक त्याच्या शोधार्थ रवाना झाले. भास्तन येथील शत्रुघ्न मिरगे व त्याचा चुलत भाऊ सोपान मिरगे यांच्यात बऱ्याच दिवसांपासून शेतजमिन मोबदल्याच्या रकमेसाठी वाद सुरू होते. दरम्यान, १७ जानेवारी रोजी शत्रुघ्न मिरगे, त्याची पत्नी व मेहुणी सोपान मिरगे यांना भेटण्यासाठी माटरगाव येथील आठवडी बाजार परिसरात गेले. सोपानसोबत त्याची पत्नी मिना, मुलगाही हजर होता. यावेळी त्यांच्यात झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.
सोपानने रागाच्या भरात शत्रुघ्नच्या डाेक्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यामध्ये तो जागीच ठार झाला. मृतकाची पत्नी व मेहुणीवरही कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. माहिती मिळताच ठाणेदार अमोल सांगळे व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. दोन्ही जखमी महिलांना पोलिसांनी उपचारासाठी खामगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तर मृतकाला खामगाव येथे खासगी वाहनाने नेण्यात आले.
सोपानचे वडील सदाशिव व शत्रुघ्नचे वडील श्रीराम मिरगे हे सख्खे भाऊ आहेत. त्यांची शेतजमिन जिगाव प्रकल्पात संपादित झाली आहे. जमिनीच्या मोबदल्याची रक्कम सोपानचे वडील सदाशिव मिरगे यांच्या बँकखात्यात काही दिवसांपूर्वी जमा झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये आपलाही हिस्सा असल्याचा दावा शत्रुघ्नने केला. त्यावरून गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात वाद होता. त्यातूनच ही घटना घडली आहे.
शत्रुघ्न व सोपान मिरगे यांच्यात यापूर्वीही तब्बल आठवेळा पैशांच्या वादातून मारहाणीच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी जलंब व खामगाव पोलिस स्टेशनमध्ये परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल आहेत.