Fake call about a major accident made directly to Eknath Shinde : पोलीस प्रशासन हादरले, बनावट कॉल असल्याचे झाले स्पष्ट
Akolaअकोला-वाशीम रोडवरील पातूरच्या पुढे झाल्याची खोटी माहिती देत एका अज्ञात व्यक्तीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच फसवण्याचा प्रयत्न केला. “भीषण अपघात झाला असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे, काही जखमी आहेत आणि त्यांना उपचारासाठी मदतीची गरज आहे,” असा थेट फोन शिंदेंना सकाळी सुमारे अकरा वाजता आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने अकोल्याचे शिवसेना (शिंदे गट) संपर्कप्रमुख आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना दूरध्वनीद्वारे सूचना दिल्या, “त्वरित घटनास्थळी जा आणि अपघातग्रस्तांना मदत करा.”
शिंदे यांचे आदेश मिळताच बाजोरिया यांनी जिल्हा प्रमुख आश्विन नवले यांच्यासह कार्यकर्त्यांना सतर्क केले. काहींना अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) अपघात कक्षात सज्ज राहण्यास सांगण्यात आले, तर स्वतः नवले यांना घेऊन ते घटनास्थळी रवाना झाले. मात्र, पातूरपासून समृद्धी महामार्गापर्यंत जवळपास ४२ किलोमीटरचा परिसर शोधल्यानंतरही कुठेही अपघात झाल्याचे आढळले नाही. दोन तासांच्या तपासानंतर हा प्रकार पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांना फसवण्यासाठी कोणी आणि कोणत्या उद्देशाने खोटी माहिती दिली, याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेनंतर अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक स्वतः कारवाईच्या मोडमध्ये आले असून, कॉल करणाऱ्या अज्ञात ठगाचा शोध सुरू आहे.
माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया म्हणाले, “घटनेबाबत माहिती मिळताच आम्ही तातडीने घटनास्थळी गेलो. मात्र, तो संपूर्ण प्रकार बनावट असल्याचे समजल्यावर लगेच पोलिसांना माहिती दिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिशाभूल करण्याचा हा गंभीर प्रयत्न आहे.”
या प्रकारानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील उच्च पदस्थ नेत्यांना अशा प्रकारे फसवण्याचा प्रयत्न हा धोकादायक प्रवृत्तीचा नमुना असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या बनावट कॉलच्या मूळ स्रोताचा शोध घेण्यासाठी सायबर युनिटची मदत घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.








