₹10 lakh fraud: living mother falsely declared dead : जळगाव जामोद येथील धक्कादायक प्रकार; पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू
Jalgao Jamod : स्वार्थासाठी स्वतःच्या जिवंत आईला मृत घोषित करून बनावट मृत्युपत्र तयार करत नगरपरिषद कार्यालयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जामोद येथे उघडकीस आला आहे. या खोट्या मृत्युपत्राच्या आधारे आरोपी मुलाने आईच्या बँक खात्यातील तब्बल १० लाख रुपयांची मुदत ठेव (एफडी) मोडून रक्कम काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २३ नोव्हेंबर रोजी घडली असून, याबाबत १५ डिसेंबर रोजी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. फिर्यादी सुनील देवीदास निकाळजे (विद्युत अभियंता, नगरपरिषद, जळगाव जामोद) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी प्रेमसिंग कमलसिंग राजपूत (रा. राजपूतपुरा, जळगाव जामोद) याने स्वतःच्या आईच्या मृत्यूबाबत खोटे स्वयंघोषणापत्र तयार करून ते नगरपरिषद कार्यालयात सादर केले.
या बनावट कागदपत्रांच्या आधारे नगरपरिषदेकडून आईचे मृत्युपत्र मिळविण्यात आले. त्यानंतर बँकेत आईच्या नावाने असलेली सुमारे १० लाख रुपयांची मुदत ठेव मोडून आरोपीने रक्कम काढल्याचे तक्रारीत नमूद आहे.
हा प्रकार उघडकीस येताच संबंधित महिलेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Health Survey : शोध अभियानात जिल्ह्यात ८३ नवीन कुष्ठरोगी आढळले
या प्रकरणी कौशल्याबाई राजपूत यांनीही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच यापूर्वी अनेकवेळा नगरपरिषद कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, “आम्ही काही करू शकत नाही,” अशी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने आपण हतबल झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक नितीनकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नारायण सरकटे करीत आहेत.








