Two murders in 24 hours; Thrill in Amravati district : २४ तासांत दोन खुनाच्या घटना; अमरावती जिल्ह्यातील थरार
Amravati : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २४ तासांत घडलेल्या दोन खुनांच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. एका घटनेत व्यसनी मुलाने आपल्या जन्मदात्रीचा खून केला, तर दुसऱ्या घटनेत संतप्त वडिलांनी आपल्या तरुण मुलाला संपविले. पहिली घटना तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामनापूर घुसळी येथे ३१ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ५:१५ दरम्यान घडली. दुसरी घटना वरूड तालुक्यातील गणेशपूर येथे १ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान घडली.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील कामनापूर घुसळी येथे उषा शंकर चामलाटे (५०) यांचा ३१ मार्च रोजी कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताच्या १७ ते १८ वर्षांच्या मुलाविरोधात १ एप्रिल रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Raju Shetti : शेतकरी आत्महत्यांसाठी सरकारला लाज वाटली पाहिजे!
मुलाला दारू आणि सिगारेटचे व्यसन होते. त्यामुळे उषा चामलाटे त्याला वारंवार समजावत होत्या. ३१ मार्च रोजीही त्यांनी त्याला दारू आणि सिगारेट पिण्याबाबत जाब विचारला. संतप्त झालेल्या मुलाने आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. गावकऱ्यांनी उषा चामलाटे यांना धामणगाव रेल्वे येथे उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मुलाला संपविणारा बाप अटकेत..
दुसऱ्या घटनेत संतप्त झालेल्या वडिलांनी आपल्या ४० वर्षीय मुलाच्या डोक्यावर व छातीवर कुऱ्हाडीने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. १ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. सुरेश छोटेलाल बुवाडे (४०, गणेशपूर) असे मृताचे नाव आहे.
गणेशपूर येथे आरोपी आणि फिर्यादीच्या राहत्या घरी ही घटना घडली. याप्रकरणी मृताची आई नानीबाई बुवाडे (५७) यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी आरोपी छोटेलाल भावजी बुवाडे (६७, रा. गणेशपूर जामठी, ता. वरूड) याच्याविरोधात १ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
Harshawardhan Sapkal : ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून विशेष पॅकेज आणा!
वडिलांनी त्रस्त होऊन उचलले टोकाचे पाऊल..
सुरेश बुवाडे हा वडिलांना नेहमी शिवीगाळ करायचा. तो वारंवार त्यांच्यावर धावून जात असल्याने वडील संतप्त झाले होते. या रागाच्या भरात त्यांनी झोपलेल्या मुलाच्या डोक्यावर आणि छातीवर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केल्याचे मृताच्या आईने वरूड पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.