Protest at the District Superintendent of Agriculture Officer’s office : जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन
Washim : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२४ मधील सोयाबीन नुकसानीचा तसेच रब्बी हंगामातील हरभरा व गव्हाचा पीक विमा तत्काळ मिळावा. तसेच अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत त्वरीत वितरित करावी, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
२१ जानेवारी रोजी स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामूअण्णा इंगोले यांच्या नेतृत्वात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या दरम्यान, पीक विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक सोमेश देशमुख यांनी ३१ जानेवारीपर्यंत पीकविमा वितरणाबाबत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
Ramtek festival: रामटेक महोत्सवात उदित-आदित्य नारायण यांनी केली धमाल
निवेदनांची दखलच नाही
या विषयावर यापूर्वी २ व १६ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने संघटनेने ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. वाशिम जिल्ह्यासाठी नेमलेल्या भारतीय कृषी विमा कंपनीकडून मंजूर झालेल्या पीकविम्याच्या रकमेच्या वितरणात वारंवार विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुढचे आंदोलन १० हजार शेतकऱ्यांचे
पीकविमा वितरणातील दिरंगाई थांबवून शेतकऱ्यांना हक्काचे विमा लाभ तत्काळ देण्यात यावे, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. अन्यथा १०,००० शेतकऱ्यांना सोबत घेऊन पुढील तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दामूअण्णा इंगोले यांनी दिला. शेतकऱ्यांचा पीकविमा मिळण्याचा प्रश्न हा त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रशासनाने व संबंधित संस्थांनी हा विषय प्राधान्याने हाताळावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.








