Sanjay Raut gets angry; Nepal warns Shinde group : संजय राऊत भडकले; शिंदे गटाला नेपाळचा इशारा
Mumbai : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन विजयी झाल्यानंतर क्रॉस व्होटिंगची चर्चा सुरू झाली आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना अपेक्षेपेक्षा कमी मतं मिळाल्याने ही चर्चा रंगात आली आहे. महाराष्ट्रातून मतं फुटल्याचा दावा शिंदे गटाने केला असला तरी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तो फेटाळून लावत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली.
“तुम्ही विकले गेलात, शरण गेलात, स्वाभिमान गहाण पडलाय आणि निष्ठावंतांवर शिंतोडे उडवताय. फार शहाणपणा करू नका, नाहीतर नेपाळमध्ये जे झालं, ते महाराष्ट्रात तुमच्याबाबतीत व्हायला वेळ लागणार नाही,” असा थेट इशारा राऊतांनी शिंदे गटाला दिला.
Maratha movement : अखेर मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय
राऊतांनी निवडणुकीत झालेल्या अनियमिततेचाही मुद्दा उपस्थित केला. “15 मतं अवैध ठरवली गेली, ती सर्व इंडिया आघाडीला मिळणारी होती. ज्याच्या हातात सत्ता, ताकद आणि पैसा असतो त्यांच्याकडून असं घडतं,” असा आरोप करत त्यांनी मतचोरीची शक्यता वर्तवली.
महाराष्ट्रातील मतं फुटल्याचा दावा फेटाळताना राऊत म्हणाले, “नशीब की शिंदे गटाने ठाकरे गटाची 25 किंवा पवार गटाची 27 मतं फुटली असं म्हटलं नाही. असं बोलणाऱ्यांना मेंदूच नाही. आमचे निष्ठावंत कार्यकर्ते अपमानित करण्याचा हा प्रकार आहे.” राऊतांच्या या तीव्र प्रतिक्रियेनंतर उपराष्ट्रपती निवडणुकीच्या निकालापलीकडे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.