Breaking

Cyber Crime : आठ वर्षांत एकाच माणसाला ५० सायबर गुन्हेगारांनी गंडवले!

50 cybercriminals cheated the same man in eight years : खासगी कंपनीच्या पॉलिसीच्या नावाखाली ५१ लाखांची फसवणूक

Amravati एकदा फसवणूक झालेला माणूस फारतर दुसऱ्यांदा फसतो. पण एका निवृत्त बँक कर्मचाऱ्याला गेल्या आठ वर्षांत तब्बल ५० सायबर गुन्हेगारांनी गंडवल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम दहा-वीस हजाराची नसून तब्बल ५१ लाख रुपयांहून अधिक आहे. आठ वर्षांमध्ये एकदाही आपली फसवणूक होत आहे, याची शंका न येणे आश्चर्याचे मानले जात आहे.

शहरातील एका निवृत्त बँक कर्मचाऱ्याची २०१४ ते २०१७ दरम्यान १४ खासगी पॉलिसी खरेदीच्या नावाखाली तब्बल ५१ लाख १० हजार ५४१ रुपयांची फसवणूक झाली आहे. प्रीमियम भरण्यासाठी अनोळखी व्यक्तींनी बँक कर्मचाऱ्याला गंडवून २०१७ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत विविध २५ खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करायला लावले.

Sajid Khan Pathan : रुग्णालयाच्या इमारतींचे निकृष्ट दर्जाचे काम सभागृहात गाजणार

सायबर पोलिसांनी ५० अनोळखी मोबाइल क्रमांक आणि अकाउंटधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा रकमेचा प्रवाह उत्तर प्रदेश आणि दिल्लीमधील बँक खात्यांमध्ये गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

२०१४-२०१७ या कालावधीत बँक कर्मचाऱ्याने विविध चार ते पाच खासगी कंपन्यांकडून भविष्यासाठी आर्थिक नियोजन म्हणून १४ पॉलिसी खरेदी केल्या. २०१७ पासून अनोळखी व्यक्ती पॉलिसी कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून फोन करू लागले आणि वेगवेगळ्या खात्यांवर प्रीमियम भरण्यास सांगू लागले.

काही पॉलिसींसाठी १० हजार ते २० हजार रुपये दरमहा प्रिमियम भरला गेला. तर एका पॉलिसीसाठी १ लाख २० हजार रुपयांपर्यंत प्रीमियम भरला गेला. बँक कर्मचाऱ्याने ‘एनईएफटी’ NEFT आणि ‘आरटीजीएस’च्या RTGS माध्यमातून पैसे ट्रान्सफर केले. सायबर गुन्हेगारांनी १ कोटी ७० लाख रुपयांच्या बनावट धनादेशाचा फोटोही पाठवला.

Crime in Amravati : अमरावतीत युवकाची हत्या; शहरात तणावाचे वातावरण!

त्यामुळे बँक कर्मचाऱ्याला पॉलिसी मॅच्युअर होईल आणि निवृत्तीनंतर मोठी रक्कम मिळेल, असे वाटले. २०१७ ते २०२५ या कालावधीत बँक कर्मचाऱ्याने २५ अनोळखी खात्यांवर ५१ लाख १० हजार ५४१ रुपये पाठवले. काही महिन्यांपूर्वी पॉलिसी मॅच्युअर्ड झाली की नाही, याबाबत माहिती घेतली असता, त्या सर्व पॉलिसी लॅप्स झाल्या असल्याचे समोर आले.

यानंतर बँक कर्मचाऱ्याने सायबर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. फसवणुकीची रक्कम ५१ लाखांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. सायबर पोलिसांच्या तपासात ५१ लाख १० हजार ५४१ रुपयांच्या ट्रान्सफरचे स्टेटमेंट मिळाले आहेत. तरीही काही transactions चे पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे फसवणुकीची रक्कम यापेक्षा अधिक असू शकते, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.