Dadarao Keche’s name for Legislative Council : विधान परिषदेसाठी भाजपची नावे दिल्ली दरबारात
विधान परिषदेसाठी येत्या २७ मार्चला होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने तीन नावे दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठविली आहेत. यात विदर्भातील आर्वीतील भाजपचे माजी आमदार दादा केचे यांचा समावेश असल्याचे समजते. इतर दोघांमध्ये चुरस असून नेहमीप्रमाणे माधव भंडारी यांच्याही नावाची चर्चा आहे.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या पाच आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने विधान परिषदेतील या जागा रिक्त झाल्या आहेत. यात चार आमदार भाजपचे व एक राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. नागपूर मध्य मतदारसंघातून निवडून आलेले प्रवीण दटके यांनीही विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या रिक्त जागेवर दादा केचे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आर्वीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे निवडून आले आहेत. परंतु त्यांच्याविरोधात केचे यांनी बंडखोरी केली होती.
अखेर विधान परिषद देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी बंडाचा झेंडा खांद्यावरून उतरविला होता. यामुळे नागपुरातून रिक्त झालेल्या या जागेवर दादा केचे यांचा सर्वाधिक दावा असल्याचे बोलले जात आहे. या स्थितीत संदीप जोशी व सुधाकर कोहळे यांना पुन्हा काही काळ प्रतिक्षा करावी लागेल, असे बोलले जात आहे.
भाजपच्या वाट्याला तीन जागा येणार आहेत. यात उर्वरित जागांमध्ये प्रत्येकवेळी चर्चेत राहणारे माधव भंडारी यांचे नाव असल्याचे बोलले जात आहे. भाजपची बाजू प्रभावीपणे मांडणार्या माधव भंडारी यांना गेल्या अनेक वर्षांपासून डावलले जात आहे. रा. स्व. संघाची पार्श्वभूमी असतानाही त्यांना अद्यापपर्यंत संधी मिळालेली नाही. हा अन्याय यावेळी पूर्ण होईल काय हे येत्या एक-दोन दिवसातच स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख १७ मार्च आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे जिल्ह्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू नाना काटे यांना संधी जाईल, असे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीची एकजूट?
विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच महायुती व महाविकास आघाडी निवडणुकीच्या रणांगणात एकमेकांसमोर येणार आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता पाच जागांपैकी महाविकास आघाडीची एक जागा निवडून येऊ शकते. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची होती. त्यामुळे या पक्षाला जाणार की शिवसेना व काँग्रेसच्या कोट्यात जाईल, हे स्पष्ट झालेले नाही.
निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीची मते एकजूट राहील की नाही याबाबत नक्कीच काहीच सांगता येत नाही. त्यामुळे अविरोध निवडणूक न झाल्यास महाविकास आघाडीला गळती लागण्याची शक्यता आहे.








