New explosion in politics, serious allegations from Shinde group : राजकारणात नवा स्फोट, शिंदे गटाचा गंभीर आरोप
Nagpur : शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कॅश व्हिडीओ प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना आता या प्रकरणाला नव्या वळण देणारा आरोप समोर आला आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आरोप केला की महेंद्र दळवी यांचा व्हायरल व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनीच अंबादास दानवेंना पाठवला असण्याची मोठी शक्यता आहे. थोरवे यांनी म्हटले की, रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी कुटीलनीती रचत ठाकरे गटाशी संगनमत करून हा व्हिडीओ व्हायरल केल्याचा संशय आहे. “आम्ही घरातच शत्रू पाळलाय,” या वक्तव्यासह थोरवे यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एका व्हिडीओ कॉलच्या स्क्रीनवर महेंद्र दळवी दिसत असून दुसऱ्या फ्रेममध्ये टेबलावर ठेवलेली नोटांची मोठी बंडलं दिसतात. हा व्हिडीओ सार्वजनिक करत दानवे यांनी सरकारला प्रश्न विचारला की, “या सरकारकडे शेतकरी कर्जमाफीसाठी पैसा नाही, बाकी सगळं ओक्के आहे! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?” या ट्विटनंतर महेंद्र दळवी अडचणीत आले असताना आता त्यांच्या बचावासाठी शिंदे गटाने अजितदादांच्या पक्षावरच थेट आरोपांची तीव्र झोड उठवली आहे.
Winter session : फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात खळबळजनक उलगडा
महेंद्र थोरवे यांनी स्पष्टपणे म्हटले की, “मला पूर्ण विश्वास आहे की महेंद्र दळवी असं काही करणार नाहीत. हा व्हिडीओ एआयच्या माध्यमातून बनवण्यात आला असण्याची शक्यता आहे. अंबादास दानवे यांनी जाणीवपूर्वक अधिवेशनाच्या काळात हा व्हिडीओ व्हायरल केला. त्यांना व्हिडीओ कोणीतरी दिला असणार आणि रायगडमधील राजकारणाचा धागा पाहता तटकरे आणि दानवे यांचे संगनमत यात असू शकते.” थोरवे यांनी तिखट शब्दांत आरोप केला की, रायगडमध्ये शिवसेनेच्या आमदारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुनील तटकरे कायमच करतात. त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या कटात राष्ट्रवादी नेत्यांचा हात असू शकतो.
Winter session : अंबादास दानवे यांच्या ‘कॅश बॉम्ब’ व्हिडिओने अधिवेशनात खळबळ
ते पुढे म्हणाले की, “शिवसेना–भाजप–रिपाई ही जुनी युती असताना भाजपने अजित पवार यांना सत्तेत घेतले आणि त्याचा फटका आम्हाला रायगडमध्ये बसला आहे. तटकरे विरोधकांना हाताशी धरून नेहमी खेळी करतात. त्याच पद्धतीने हा व्हिडीओ समाजामध्ये पसरवला गेला असण्याचा संशय आहे.” त्यांच्या या आरोपांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदार सुनील तटकरे काय प्रतिक्रिया देतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Local body elections : मालमत्ता करवाढीचा अधिकार महापालिकेचा; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
दरम्यान, महेंद्र दळवी यांनीही हा व्हिडीओ एआयच्या सहाय्याने तयार केलेला असल्याचे म्हटले असून कटकारस्थानाचा आरोप करत ते लवकरच कायदेशीर पावलं उचलणार असल्याचे संकेत दिले आहेत. तर विरोधकांचे म्हणणे आहे की हा मुद्दा दडपला जाणार नाही आणि सर्व तथ्ये जनतेपुढे आली पाहिजेत. कॅश व्हिडीओ प्रकरणामुळे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन राजकीय आरोप- प्रत्यारोपांनी पेटण्याची शक्यता अधिकच तीव्र झाली आहे.
____








