Farmers Climb Tower Demanding Compensation for Losses : सोलर कंपनीच्या कामामुळे शेतात पाणी शिरल्याने जमिनीचे नुकसान; धानोरा कोकाटे येथील शेतकऱ्यांचे आंदोलन
Amravati धानोरा (कोकाटे) येथील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी अनोखा मार्ग अवलंबत गावातील मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन केले. सोलर कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शेतात पाणी शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
तीन वर्षांपूर्वी गावालगत एका कंपनीने सोलर प्लँट उभारला होता. त्यासाठी रस्ता व पूल बांधण्यात आले; मात्र हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी पावसाचे पाणी शेतात साचून शेती व पिकांचे नुकसान झाले. याच कारणावरून शेतकऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी अन्नत्याग आणि जलसमाधी आंदोलनही केले होते.
त्या आंदोलनानंतर कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु ते प्रत्यक्षात न आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा टॉवर चढून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. स्वप्नील भुयार, सौरभ कोहळे आणि गुरुदत्त कोकाटे या तिघा शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून सात तास काळ्या फिती बांधून आंदोलन केले. “नुकसान भरपाई मिळेपर्यंत खाली उतरणार नाही,” असा इशारा आंदोलकांनी दिला.
या वेळी अनेक शेतकरी घटनास्थळी उपस्थित होते, तर माहूली जहागिर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी बंदोबस्त ठेवला होता.
“गेल्या महिन्यात आम्ही अन्नत्याग आणि जल आंदोलन केले होते. त्यावेळी कंपनीकडून आश्वासन मिळाले, पण अजूनही पूर्तता झालेली नाही. त्यामुळेच आम्हाला टॉवरवर चढण्यास भाग पाडले गेले. आता २८ ऑक्टोबरला कंपनी अधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. त्या चर्चेच्या निकालावर पुढील निर्णय घेऊ, असे आंदोलक शेतकरी सौरभ कोहळे यांनी सांगितले.








