Congress leader Vijay Vadettiwar’s anger on the government : धान, फळबागांचे मोठे नुकसान पण पंचनामे करण्याचा आदेश निघाला नाही
Nagpur : महायुती सत्तेत आल्यापासून केवळे रस्ते, रस्ते आणि रस्तेच बांधण्याचे काम सुरू आहे. दळणवळणासाठी रस्ते हवेच, त्याला विरोध नाही. पण जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी तेवढाच किंबहुना त्यापेक्षाही महत्वाचा आहे, हे सत्ताधारी सोयीस्करपणे विसरत आहेत. येवढे मोठे अस्मानी संकट आले असतानाही सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. म्हणजे शेतकरी मेला तरी चालेल, पण रस्ते झाले पाहिजे, अशीच सरकारची भूमिका दिसते आहे, असे म्हणत काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर संताप व्यक्त केला.
राज्यात अवकाळी पाऊस झाला, सध्याही सुरूच आहे. राज्यात रोज कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. पण याकडे सरकारचे लक्ष नाही. धान, फळबागा, केळीच्या शेतांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. आतापर्यंत पंचनामे होऊन जायला पाहिजे होते. पण अद्याप सरकारकडून पंचनामे करण्याचे आदेशही निघाले नाहीत. शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. निवडणुकीत दिलेल्या वचनाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफीही केलेली नाही. पेरणी तोंडावर आलेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने करावे काय, हे आता सरकारनेच सांगावे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
अवकाळीसोबत आणखी एक मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर आहे ती म्हणजे जंगली प्राण्यांची. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आठ जणांचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेलेला आहे. शेतकरी आणि शेतमजुरांचे मोठे नुकसान झाले आहे. जंगली जनावरांच्या वावरामुळे शेती करणे कठीण होऊन बसले आहे. एकदा शेतात गेलेला माणूस जिवंत घरी परत येईल की नाही, याची खात्री देता येत नाही. येवढी गंभीर स्थिती झालेली आहे. शेतांच्या बाजुला असलेल्या जंगलाला कुंपण घालावे, ही मागणी केली. पण सरकार लक्ष देत नाही. शेतकरी शेती सोडू शकत नाही. त्यामुळे पालकमंत्री आणि वनमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा आणि जंगलाला कुंपण करावे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.