Manikrao Kokate is new Sports and Youth Welfare minister : कोकाटेंकडे आता क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विभाग
Mumbai : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंकडून अखेर कृषी खाते काढून घेण्यात आले असून, त्यांच्याकडे नवीन खाते सोपविण्यात आले आहे. महायुती सरकारने कोकाटेंच्या वादग्रस्त विधानं आणि अलीकडील रमी प्रकरणामुळे त्यांच्यावर कारवाई करत खातेबदलाचा निर्णय घेतला आहे.
माणिकराव कोकाटेंकडील कृषी खाते आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आले असून, कोकाटेंना क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ हे विभाग देण्यात आले आहेत. कोकाटेंच्या खातेबदलाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती आणि आता त्यावर अधिकृत निर्णय घेण्यात आला आहे.
Shivendraraje Bhosale : चिखलीमध्ये चौपदरीकरणासह ५ कामांना हिरवी झेंडी
कृषी मंत्री म्हणून कार्यभार सांभाळताना कोकाटेंनी अनेकदा वादग्रस्त विधानं केली होती. ‘ शासन भिकारी आहे, शेतकरी नाही’, ‘ कृषी खाते म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी’ अशा वक्तव्यांमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. याशिवाय, पावसाळी अधिवेशनात सभागृहात रमी खेळताना दिसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामुळे त्यांच्या भूमिकेवर अधिकच संशय निर्माण झाला.
या प्रकरणांमुळे महायुती सरकार अडचणीत सापडले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात होते. काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला होता आणि मंत्रिमंडळातील बदलांची चर्चा रंगली होती. अखेर यामध्ये पहिला निर्णय माणिकराव कोकाटेंच्या खात्याच्या बदलासंदर्भात घेण्यात आला.
Agriculture Ministry : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ७२ कृषी केंद्रांचे परवाने रद्द
महायुती सरकारने हा निर्णय घेत कोकाटेंना इशारा दिला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. वादग्रस्त विधानं आणि असंवेदनशील वर्तनाचा गंभीर परिणाम मंत्रिपदावर होऊ शकतो, हे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.