No shortage of funds for the Amravati District Sports Complex : अमरावती जिल्हा क्रीडा संकुलासाठी दत्तात्रय भरणे यांचा शब्द
Amravati राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अमरावती जिल्हा क्रीडा संकुलाला सदिच्छा भेट दिली. संकुलातील विविध क्रीडा सुविधांची पाहणी केली. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी निधीची कमतरता पडणार नाही, असा शब्दही क्रीडामंत्र्यांनी दिला.
क्रीडामंत्री भरणे यांनी यावेळी ‘खेलो इंडिया’ अंतर्गत सुरू असलेल्या आर्चरी सेंटरसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्क्वॅश कोर्ट, ज्युदो, कुस्ती, कबड्डी, बॅडमिंटनसाठीचा बहुउद्देशीय हॉल, आधुनिक जिम, कार्यालये तसेच सध्या प्रगतीपथावर असलेले क्रीडा वसतिगृह या सर्व सुविधांची सविस्तर पाहणी केली. संकुलातील सुसज्जतेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अमरावतीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा आयोजित करता येतील, असे मत व्यक्त केले.
या संकुलातून भविष्यात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी अमरावती विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, तालुका क्रीडा अधिकारी आर. व्ही. वडते, क्रीडा कार्यकारी अधिकारी ममता कोळमकर आदी उपस्थित होते.
क्रीडामंत्री भरणे यांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचलित ‘डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन’ या बहुसंकाय स्वायत्त महाविद्यालयाच्या ११ व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. अनंत क्रीडा जिम्नॅस्टिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य, अध्यक्ष प्रशांत देशपांडे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, प्राचार्य श्रीनिवास देशपांडे आदी उपस्थित होते.
Lord Shri Ram : अकोल्यातून ८३४ जेष्ठ नागरिकांची विशेष तीर्थ रेल्वे !
क्रीडामंत्री भरणे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना सांगितले की, “श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ क्रीडा क्षेत्रात तळमळीने कार्य करत असून या संस्थेसाठी शासनाकडून आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्यात येईल.” यावेळी पद्मश्री प्रभाकर वैद्य यांनी संस्थेची वाटचाल व योगदान यावर प्रकाश टाकला. डॉ. असनारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर प्रशांत देशपांडे यांनी संस्थेची माहिती दिली.