Controversy sparks over new Agriculture Ministers strange statement : नव्या कृषिमंत्र्यांचं अजब विधानावरून पुन्हा वाद
Pune: राज्यातील नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांचे इंदापूर येथील पहिलं भाषण सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. महसूल दिनाच्या कार्यक्रमात केलेल्या त्यांच्या एका विधानाने उपस्थित अधिकाऱ्यांनाच नाही, तर संपूर्ण प्रशासन आणि जनतेच्या मनातही प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळाच्या कामकाजावेळी रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंत्रिपद गमवावं लागलं. त्यांच्याकडे आता केवळ क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी आहे. त्यांची जागा घेतलेले दत्तात्रय भरणे, शेतकरी कुटुंबातून आलेले असून, त्यांच्या अनुभवाचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.
Harshwardhan Sapkal : शेतकऱ्यांच्या वेदनेचे फक्त सांत्वन नको, ठोस आधार द्या
परंतु, त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात “सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात” असं विधान केल्यानंतर एकच खळबळ उडाली.या विधानामुळे महसूल विभागातील पारदर्शकतेवर आणि प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. अधिकारी वर्गामध्ये क्षणभर गोंधळाचे वातावरण निर्माण झालं, आणि नंतर त्या विधानाचा अर्थ लावण्याच्या उलटसुलट चर्चा रंगल्या.
काहींचं म्हणणं आहे की हे विधान ‘प्रॅक्टिकल’ अनुभवावर आधारित असलं, तरी ज्या व्यासपीठावर ते केलं गेलं त्याची गंभीरता भरणे यांना समजली पाहिजे होती. महसूल दिनासारख्या शासकीय कार्यक्रमात अशा प्रकारचं मार्गदर्शन करणं हे नक्कीच विचारात घेण्यासारखं आहे. भरणे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “कृषिमंत्री पदाची माळ माझ्या गळ्यात पडली आहे याचा मला आनंद आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, आणि हा विभाग आता माझ्याकडे आला हे समाधानाचं आहे.” त्यांनी आपली पार्श्वभूमी मांडत शेतकऱ्यांप्रती असलेल्या बांधिलकीची जाणीवही करून दिली.
Devendra Fadanvis : सर्व हिंदुंना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेसचे षडयंत्र होते !
स्थानिक पातळीवर या विधानाची जोरदार चर्चा सुरु असून, सोशल मीडियावर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी भरणे यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलंय, तर अनेकांनी त्यांचं विधान ही एक चुकीची सुरुवात असल्याची टीका केली आहे. भरणे यांच्या शेतकरी पार्श्वभूमीचा फायदा राज्यातील कृषी धोरणांना होईल, अशी अपेक्षा ठेवली जात आहे. मात्र, सार्वजनिक व्यासपीठावर केलेल्या विधानांची भाषा आणि सूचकता यांचं भान मंत्र्यांनी पाळणं गरजेचं आहे. अन्यथा, सुरुवातीलाच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.