Congress state president Harshvardhan Sapkal’s explosive allegation : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा स्फोटक आरोप
Buldhana : महाराष्ट्राच्या राजकारणात दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एक राजकीय बॉम्ब फोडला गेला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी असा धक्कादायक दावा केला आहे की, सत्ताधारी पक्षातील तब्बल 21 आमदारांना एका ठेकेदाराकडून “डिफेंडर” कारची दिवाळी भेट देण्यात आली आहे. या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण एकदम तापलं असून, या प्रकरणामागे नेमकं कोण आहे, हे समोर येणं राज्याच्या सत्तेतील लोकांसाठी डोकेदुखी ठरू शकतं.
बुलढाणा येथे पत्रकारांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ यांनी हा आरोप केला. त्यांच्या मते, “एका ठेकेदाराने सत्ताधारी 21 आमदारांना महागड्या डिफेंडर कारची भेट दिली आहे. राज्यात एक कार बुलढाण्यात आली आहे, पण असं वाटतं की कदाचित 22 गाड्या दिल्या असतील,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
सपकाळ यांनी थेट कोणत्याही आमदाराचं नाव घेतलं नाही, पण त्यांच्या वक्तव्याचा रोख कुणाकडे आहे हे समजायला विशेष वेळ लागला नाही. “आता महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे हे 21 आमदार कोण आहेत? तो ठेकेदार कोण आहे, ज्याने ही आलिशान भेट दिली?” असं सांगत त्यांनी संकेत दिला की, या प्रकरणाचं उत्तर लवकरच राज्याला कळेल.
local body elections : वंचितच्या किल्ल्यावर भाजपचा डोळा, आव्हान पेलवणार?
राज्यातील सत्ताधाऱ्यांवर हा आरोप म्हणजे दिवाळीच्या उत्सवात राजकीय स्फोटासारखा ठरला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक पवित्र्यात कमी दिसत होते, पण या आरोपाने त्यांनी थेट सरकारच्या गोटात गोंधळ माजवला आहे. आता या “डिफेंडर गिफ्ट स्कॅंडल”चा स्फोट किती मोठा होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान, काँग्रेसने “मत चोरी” या मुद्यावर देखील सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्या संध्याकाळी मुंबई प्रेस क्लबमध्ये “मत चोरी” या विषयावर एक विशेष चित्रपट दाखविण्यात येणार असून, त्यानंतर चर्चा सत्रही आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला हर्षवर्धन सपकाळ स्वतः उपस्थित राहणार आहेत.
Vidarbha farmers : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत व सरसकट कर्जमाफी द्या
काँग्रेसचा उद्देश स्पष्ट आहे राज्यातील सत्ताधाऱ्यांना आणि निवडणूक प्रक्रियेतल्या गैरव्यवहारांना उघडे पाडणे. १ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीसह काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा मोर्चा काढण्यात येणार आहे, आणि या पार्श्वभूमीवर सपकाळ यांचे आरोप राज्यातील सत्ताधाऱ्यांसाठी मोठा धक्का ठरू शकतात.
मात्र काँग्रेसने हा मुद्दा स्वतंत्रपणे पुढे नेल्याने महाविकास आघाडीतील अन्य पक्ष विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी गट यांच्यातही अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच स्थानिक काँग्रेस नेत्यांना “संयम पाळा” असा अप्रत्यक्ष इशारा दिला होता.
तरीसुद्धा, हर्षवर्धन सपकाळ यांचा “डिफेंडर कार” आरोप हा महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांसाठी गंभीर ठरू शकतो. कारण हा विषय फक्त भ्रष्टाचाराचा नाही, तर सत्तेच्या गैरवापराचा आणि ठेकेदार-राजकारणी सांठगांठीचा आहे. राज्यातील जनता आता एकाच प्रश्नाचं उत्तर शोधते आहे डिफेंडर कोणाला मिळाली, आणि कशाच्या बदल्यात?
____








