A woman called out to the Chief Minister during the public meeting : सुरक्षारक्षकांची धांदल; मुख्यमंत्र्यांनीच थांबवले, फडणवीसांच्या मेळघाट दौऱ्यातील हृद्य क्षण
Amravati मेळघाटातील धारणी येथे नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा परतण्यासाठी निघाला होता. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, कार्यकर्त्यांची गर्दी आणि सभास्थळीची धामधूम अशा वातावरणात अचानक गर्दीतून एका महिलेचा मोठ्याने आवाज आला — “देवेंद्र…!”
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट नावाने दिलेली ही हाक ऐकून उपस्थित अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि नेतेमंडळी क्षणभर स्तब्ध झाले. मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांनी मागे वळून पाहिले आणि त्या महिलेपर्यंत जाऊन आत्मीयतेने भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर त्या महिलेने जुन्या आठवणी जाग्या केल्या. त्या म्हणाल्या: “माझं माहेर आणि देवेंद्र यांचं मूळ गाव — चंद्रपूर जिल्ह्यातील ‘मूल’ — हे एकच. त्यांच्या बहिणी माझ्या वर्गात शिकत होत्या. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. देवेंद्रला लहानपणी मी त्याला अंगाखांद्यावर खेळवलं आहे. इतक्या वर्षांनी भेट झाली, म्हणून मी त्याला हक्काने हाक मारली… आणि तो लगेच थांबला. नाहीतर दुसरा कोणी थांबला नसता.” महिलेने शाल आणि श्रीफळ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले आणि आपुलकीने त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
Local body election : ‘अहंकारामुळे रावणाची लंका जळाली’ – एकनाथ शिंदे
महिला पुढे म्हणाल्या: “मी साधी सामाजिक कार्यकर्ती आहे. माझ्यासाठी काही नको. पण आमच्या मेळघाटात रस्ते, नाले आणि पाण्याची भीषण समस्या आहे. लोकांचे फार हाल होतात.” यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: “तुम्ही सांगितलेल्या समस्या मी नोंदवल्या आहेत. रस्ता आणि पाण्याचे प्रश्न तात्काळ मार्गी लावतो.” भावनिक स्पर्श असलेला हा संवाद उपस्थितांनाही भावून गेला.
महिला मुख्यमंत्र्यांचा हात धरून बोलत असताना सुरक्षारक्षकांनी तिला मागे करण्याचा प्रयत्न केला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीच हस्तक्षेप करत रक्षकांना थांबवले आणि हातवारे करून — “बोलू द्या” — असे सांगितले. मेळघाटाच्या सभेत घडलेला हा मानवी स्पर्शाचा क्षण, राजकारणाच्या गर्दीतही नात्यांची उब जपणारा ठरला.








