Farmers’ protest in front of the District Co-operative Bank : जिल्हा सहकारी बँकेसमोर क्रांतीकारी शेतकरी संघटनेची निदर्शने
Buldhana निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना पीककर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. या भूमिकेच्या विरोधात क्रांतीकारी शेतकरी संघटनेने बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेसमोर आंदोलन छेडले.
महायुतीने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे वचन दिले होते. परिणामी, शेतकऱ्यांना नवीन सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात संपूर्ण कर्जमाफीची अपेक्षा होती. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात यासंदर्भात कोणतीही घोषणा झाली नाही. याउलट, अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना थकीत पीककर्ज भरण्याचा सल्ला दिला.
त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. सध्या बँकांकडून सक्तीच्या वसुलीचा तगादा लावला जात असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर, ३१ मार्च रोजी बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेसमोर शेतकऱ्यांनी निदर्शने करत सरकारचा निषेध केला. फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पाळून सातबारा कोरा करावा, अन्यथा आम्ही पैसे भरणार नाही, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली आहे. तर काही शेतकरी सक्तीच्या वसुलीमुळे कर्जफेड करत आहेत. यावेळी सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली.
Vidarbha Farmers : शासनाची सोयाबीन खरेदी व्यापाऱ्यांसाठी आहे का?
“फडणवीस साहेब म्हणतात सातबारा कोरा, अजितदादा म्हणतात पैसे भरा” अशा जोरदार घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानानंतर बँकांनी कर्जवसुलीसाठी अधिक आक्रमक पावले उचलली आहेत. अनेक शेतकऱ्यांची खाती होल्ड करण्यात आली आहेत. गावागावांत जाऊन सक्तीची वसूली केली जात आहे.
“जर सरकार आणि बँका शेतकऱ्यांवर जबरदस्ती करतील, तर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी दिला आहे. या आंदोलनात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, नितीन राजपूत, संतोष शेळके, रमेश कुटे, ज्ञानेश्वर मोरे, गजानन वाघ, राजेंद्र इगळे, भागवत वाघ, नागोराव लंबे, संदीप वाघ यांच्यासह असंख्य शेतकरी सहभागी झाले होते.