Devendra Fadnavis : फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर अकोटमधील भाजप-एमआयएम आघाडी तुटली

BJP-MIM Alliance Breaks in Akot : आमदारांसह पदाधिकाऱ्यांना ‘कारण दाखवा’ नोटीस; एमआयएम आता विरोधी बाकावर

Akola सत्तेच्या गणितासाठी विचारधारेला तिलांजली देत एमआयएमशी हातमिळवणी करणे अकोटमधील भाजप नेत्यांच्या अंगलट आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीला ‘तत्त्वशून्य’ आणि ‘अनुशासनहीनता’ ठरवत कडक कारवाईचा इशारा दिल्यानंतर, अवघ्या काही तासांतच अकोटमधील ही विचित्र आघाडी मोडीत निघाली आहे. या प्रकरणामुळे भाजपच्या गोटात मोठी खळबळ माजली असून स्थानिक नेतृत्वावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.

अकोटमध्ये एमआयएमला सोबत घेऊन ‘अकोट विकास मंच’ स्थापन करण्याच्या निर्णयात आघाडीवर असलेले आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासह शहराध्यक्ष, निवडणूक प्रभारी आणि गटनेत्यांना पक्षाने ‘कारण दाखवा’ नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य आणि केंद्रीय स्तरावरून या प्रयोगावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, पक्षाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

Eknath Shinde : ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली नाराज जगदीश गुप्तांची भेट; अमरावतीत हालचालींना वेग

३३ जागांचे निकाल लागलेल्या अकोट नगरपालिकेत भाजपला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या होत्या. मात्र बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपने एमआयएम (५ जागा), शिवसेना, राष्ट्रवादी आणि प्रहार यांना एकत्र घेत आघाडी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला पाठिंबा काढून घेण्याचे पत्र दिले. यामुळे एमआयएम आता सत्ताधारी बाकावरून थेट विरोधी बाकावर बसणार आहे.

अकोटप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ मध्येही भाजपने काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याने राजकीय आश्चर्य व्यक्त करण्यात आले. ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देणाऱ्या भाजपनेच काँग्रेसशी युती केल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळाले होते. मात्र, काँग्रेसने संबंधित नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली असून, ते आता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

Bmc election : मुंबईत जन्माशिवाय प्रश्न कळत नाहीत म्हणणं म्हणजे नैराश्य

या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, “स्थानिक पातळीवर काँग्रेस किंवा एमआयएमसोबत झालेली युती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. ही अनुशासनहीनता असून अशा प्रकारे तत्त्वांना मुरड घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.”

भाजपने तातडीने ‘डॅमेज कंट्रोल’ मोडमध्ये जात ही युती तोडली असली, तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेमुळे भाजपला आता स्थानिक पातळीवर आपली विश्वासार्हता टिकवण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.