amravati-development-300-crore-additional-funds-cm-fadnavis-approval : अजितदादांच्या निधनानंतर नियोजन विभागाची धुरा फडणवीसांच्या हाती; ४३४ कोटींचा मूळ आराखडा अपुरा पडल्याने अतिरिक्त मागणी
Amravati अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अतिरिक्त ३०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्याच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर नियोजन विभागाचा अतिरिक्त कार्यभार सध्या मुख्यमंत्री स्वतः सांभाळत असून, त्यांनी जिल्ह्यांच्या गरजांना प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले आहे.
बुधवारी पार पडलेल्या राज्य नियोजन समितीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्याची आर्थिक स्थिती मांडली. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शासनाने अमरावती जिल्ह्याचा विकास आराखडा ४३४ कोटी ७१ लाख रुपयांचा निश्चित केला आहे.
मात्र, जिल्ह्यातील विविध विभागांकडून सुमारे १२७२ कोटी ३० लाख रुपयांच्या निधीची मागणी नोंदवण्यात आली आहे. मूळ आराखडा आणि विभागांच्या गरजांमध्ये सुमारे ८३७ कोटींहून अधिक रुपयांची तूट असल्याने अतिरिक्त निधीशिवाय विकासकामे पूर्ण होणे अशक्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांनी या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शवला आहे. ३०० कोटींच्या अतिरिक्त मागणीसोबतच जिल्ह्याला आणखी १०० कोटी रुपये मिळवण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी बैठकीनंतर सांगितले. लोकसंख्या आणि १४ तालुक्यांच्या विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्रामुळे अमरावतीच्या गरजा मोठ्या असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.








