Hands folded in front of camera; PSI Gopal Badne will appear in court : कॅमेऱ्यासमोर हात जोडले; पीएसआय गोपाळ बदने कोर्टात हजर होणार
Paltan : येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने अखेर पोलिसांच्या ताब्यात आला असून, त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. तर दुसरा आरोपी पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर याला आधीच अटक करून कोर्टाने 28 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. आत्महत्येपूर्वी संपदाने आपल्या तळहातावर “गोपाळ बदने” आणि “प्रशांत बनकर” अशी नावे लिहून ठेवली होती. या दोन्ही नावांमुळे पोलिसांवर गंभीर आरोप झाले. काही तासांतच बनकरला अटक झाली, मात्र बदने फरार होता. अनेक पथके त्याचा शोध घेत होती. शेवटी रात्री उशिरा गोपाळ बदने स्वतःहून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात शरण आला.
SDO Mehkar : ‘पै-पै जमवून घेतलेले प्लॉट आता मातीमोल ठरत आहेत, आमचा गुन्हा काय?’
शरणागतीनंतर पोलिसांनी त्याची तब्बल एक तास कसून चौकशी केली. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. यावेळी कॅमेऱ्यासमोर बदनेने हात जोडले आणि “मला निष्कारण अडकवले जातेय,” असे म्हटले. या घटनेने संपूर्ण सातारा जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.
पोलिस खात्याने तत्काळ कारवाई करत बदनेला निलंबित केले आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असून, कोर्ट किती दिवसांची कोठडी सुनावते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनी या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या सर्वांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. बीड जिल्ह्यातील अनेक राजकीय नेतेही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत आहेत. समाजमाध्यमांवर संपदासाठी न्याय मिळवण्याची लाट उसळली असून, पोलिस चौकशीच्या पुढील टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
_____








