District Collector reviews the health department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा
Buldhana : आपात्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा तत्काळ उपलब्ध करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने नेहमी तत्पर राहून चांगली सेवा द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कै. उ. झिने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी तसेच सहायक संचालक आरोग्य सेवा, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक आदी उपस्थित होते.
डॉ. पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रीय व राज्य महामार्ग, रेल्वे लाईन तसेच संवेदनशील ठिकाणी अपघात किंवा आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास आरोग्य सेवा तत्काळ पोहोचणे आवश्यक आहे. या दृष्टीने, रुग्णवाहिका, रुग्णालयातील बेड, ऑक्सीजन, औषध, रक्ताची उपलब्धता सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेने नियमितपणे कार्यशाळा आयोजित करून आपला ज्ञानवर्धन साधावा.
प्रत्येक भागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वात समिती स्थापन केली जावी. जेणेकरून ते इतर कर्मचार्यांना मार्गदर्शन करू शकतील. त्यांनी बाळंतपण झालेल्या महिलांना 102 क्रमांकाच्या गाडीतून घरपोच पोहोचवण्याचे प्रमाण वाढवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. मातामृत्यु व बालमृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
Davos Agreement : दावोसच्या करारात पश्चिम विदर्भाकडे दुर्लक्ष!
आशावर्कर आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून नवजात बालकांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून लसीकरणाची खात्री करणे महत्त्वाचे आहे. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2025 दरम्यान कुष्ठरोग जनजागृतीसाठी विविध आरोग्य शिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी, जिल्ह्यातील लसीकरण मोहीम, महिला हिमोग्लोबीन तपासणी, मातामृत्यु प्रमाण, बालमृत्यु प्रमाण, जननी सुरक्षा योजना, कुटुंब नियोजन, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण व अन्य कार्यक्रमांचा आढावा घेतला.