Ministerial conference will boost the mining industry in Maharashtra : मंत्री परिषदेमुळे महाराष्ट्रातील खाण उद्योगास चालना मिळेल
Wardha News : खनिज गटांच्या लिलावात महाराष्ट्राने देशातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. ओडिशातील कोणार्क येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील तिसऱ्या खाणमंत्री परिषदेत राज्याचे खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सोमवारी (20 जानेवारी) हा पुरस्कार स्वीकारला.
भारत सरकारच्या खाण मंत्रालयाने २० आणि २१ जानेवारी रोजी ओडिशा राज्यातील कोणार्क येथे तिसऱ्या खाणमंत्री परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत देशातील प्रमुख खनिज खाण क्षेत्राच्या लिलावांवर तसेच राज्यांद्वारे पार पाडल्या जाणाऱ्या खाण उद्योगाशी संबंधित सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा करण्यात आली. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी परिषदेच्या अध्यक्षस्थानी होती.
केंद्रीय खाण आणि कोळसामंत्री जी. किशन रेड्डी यांनी सोमवारी परिषदेला उपस्थित राहून खाण उद्योगात होत असलेल्या अनेक सुधारणा आणि शाश्वत खाणकामासाठी राबविण्यात येणाऱ्या शोध व योजनांच्या भविष्यातील गरजा, याविषयी देशातील खाणमंत्र्यांना मार्गदर्शन केले.
Employment Guarantee Scheme : उधारीवरच राबायचे?, मजुरीला हरताळ, निधी रखडला !
या परिषदेत महाराष्ट्र, ओडिशा, आसाम, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश आदी राज्यांतील खनिकर्म मंत्री उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य हे खनिज गटांच्या लिलाव प्रक्रियेत अग्रेसर आहे. राज्याने आतापर्यंत जवळपास ४० खनिज गटांवर यशस्वीपणे कार्यवाही केली. महाराष्ट्र राज्याच्या खनिकर्म विभागाने ही कामगिरी पार पाडली आहे.
याबद्दल महाराष्ट्र राज्याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन मंत्री परिषदेत गौरविण्यात आले. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, केंद्रीय खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते राज्याचे खनिकर्म राज्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सोमवारी कोणार्क येथे हा पुरस्कार स्वीकारला.
Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर !
कोणार्क येथील राष्ट्रीय स्तरावरील खाणमंत्री परिषदेत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने दोन भूवैज्ञानिक अहवाल राज्याचे भूविज्ञान आणि खाण संचालनालयाचे संचालक डॉ. गजानन कामडे यांच्याकडे पुढील टप्प्यात लिलाव करण्यासाठी सुपुर्द केले आहेत. दोन दिवसीय परिषदेत राज्याचे खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी बोलताना या मंत्री परिषदेमुळे महाराष्ट्रातील खाण उद्योगास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.