Take the decision of life at the right time, you will surely get success : रोजगार मेळाव्यात तरुणांशी साधला संवाद
Wardha युवकांनी आपले स्वत:चे आयुष्य घडविण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. सध्या स्पर्धेचे युग आहे. कोणत्याही व्यवसाय क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन घेण्यासाठी युवकांमध्ये अनुभव व कौशल्य आवश्यक आहे. स्वतःमधील कौशल्य विकसित केल्यास रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध होतील, असा कानमंत्र पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
सेवाग्राम येथील चरखागृह येथे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील हजारे, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त निता औघड, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय कोकुलवार आदी मंचावर उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रक्षिक्षणाचा युवकांनी लाभ घेऊन स्वत:मध्ये कौशल्य विकसित करावे. येणा-या काळात शासनाच्यावतीने मोठ्या उद्योग समूहाशी समन्वय साधला जाईल. जिल्ह्यातील युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असंही ते म्हणाले.
Narhari Zirwal : विशेष सहाय्य योजनांचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करा
उद्योग व व्यवसाय सुरु करण्यासाठी युवकामध्ये व्यवसायासंबंधी माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाच्यावतीने सामान्य रुग्णालयाच्या पाठीमागे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय परिसरात इन्क्युबेशन सेंटर सुरु करण्यात आले आहे. या इन्क्युबेशन सेंटर मध्ये व्यवसायासंबंधी प्रशिक्षण देण्यात येत असून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. असेही आवाहन डॉ. पंकज भोयर यांनी केले.
पुर्वी काळात रोजगाराच्या संधी रोजगार विभागामार्फत उपलब्ध करुन दिल्या जात होत्या. सध्याच्या काळात या संधी माध्यमाव्दारे तसेच सोशल मिडियाव्दारे उपलब्ध होत आहेत. यासोबतच रोजगाराची संधी उपलब्ध करुन घेण्यासाठी मुलाखत कशा प्रकारे घेण्यात येतात याबाबत सुविधा प्रशासन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी सांगितले.