Fixing in putting questions in the Legislative Assembly : आमदार परिणय फुके यांचा गंभीर आरोप, रोख कुणाकडे?
गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिलच्या भरडईच्या कामातील कथित गैरव्यवहार विधानसभेत मांडण्यासाठी फिक्सिंग झाले होते, असा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत केला. हे आरोप करताना त्यांचा रोख कुणाकडे आहे, याची आता चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसापूर्वी या संदर्भात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडला होता. यानंतर डॉ. फुके यांनी विधान परिषदेत यावर लक्षवेधी सूचना मांडली. यात निवडक सात राईस मिल्सची नावे लक्षवेधीत घेण्यात आली. या आर्थिक व्यवहाराचे फिक्सिंग झाल्याचा आरोप केला आहे. डॉ. फुके यांनी हा आरोप करताना कुणा नेत्याचे नाव घेतले नाही. परंतु हा प्रश्न नाना पटोले यांनी विधानसभेत मांडला होता, याची आठवण त्यानिमित्ताने झाली.
राईस मिल्स कार्यालयातील एजंटसारख्या असलेल्या लोकांनी प्रश्न का लावायचा? लावल्यावर काय होणार? याची चर्चा करीत पैशाच्या मागणीचाही उल्लेख करण्यात आला. या संपूर्ण संभाषणाचे ऑडिओ क्लिप असल्याचे नमुद करीत यात काही नेत्यांच्या एजंटचा समावेश असल्याचा खळबळजनक आरोप आमदार फुके यांनी गुरुवारी केला. या एजंट व नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
धानाच्या भरडाईचे काम करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील 100 ते 150 राईस मिल्सपैकी सात राईस मिल्सने 2022-23 मध्ये कमी बँक गॅरंटी दिली. तीन कोटींच्या बँक गॅरंटीवर सात कोटींची भरडाई केली आहे. असा यांच्यावर ठपका ठेवला होता, याकडे आमदार फुके यांनी लक्ष वेधले. या राईस मिलवर जवळपास 2.67 कोटी रुपये दंड करण्यात आला होता.
त्या दंडाची रक्कम ट्रान्सपोर्टरच्या बिलात अॅडजेस्ट करण्यात आली का? 2023 मध्ये तत्कालीन मंत्र्यांनी तीन चार राईस मिल्सला क्लिन चिट दिली का? असे प्रश्न उपस्थित केले. तसेच 11 मार्चला विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचेही त्यांनी नमुद केले. तसेच हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी व्यवहार झाला आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
विधानसभेत प्रश्न लावण्याच्या दोन दिवसाआधीच्या काही ऑडिओ क्लिप पुढे आल्या आहेत. काहींचे फोनवर संभाषण देखील झाले. या राईस मिल मालकाच्या कार्यालय एजंटसारखे असलेले लोक हा प्रश्न का लावायचा नाही? लावल्यावर काय होणार? अशाप्रकारच्या धमक्या देतात. तशा क्लिप माझ्याकडे आहेत. मी आज आदरणीय गृहमंत्र्यांना याबाबत सूचना दिली, असे डॉ. परिणय फुके यांनी परिषेदत सांगितले.
या प्रकरणात ब्लॅकमेल करणे किंवा पैशाची मागणी करण्यात आली आहे. यात काही नेत्यांच्या एजंटचा समावेश आहे. या एजंट व नेत्यांवर कारवाई करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यानंतर नाना पटोले व डॉ. परिणय फुके यांच्यातील राजकीय मतभेद आणखी गडद होण्याची शक्यता या आरोपातून निर्माण झाली आहे.