Breaking

Dr. Suresh Mane : ओबीसी आरक्षण निश्चित झाल्यावरच निवडणूका!

Elections only after OBC reservation is decided : बीआरएसपीची भूमिका; स्थानिक स्वराज्य संस्थांवर नजर

Nagpur बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी)ला विधानसभा व लोकसभा निवडणूकीत फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला सुरुवात केली आहे. विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान बीआरएसपीचे संस्थापक डॉ.सुरेश माने यांनी पक्षाची भूमिका मांडली. ओबीसी आरक्षण निश्चित झाल्यावरच निवडणूका व्हायला हव्यात, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष सध्या न्यायालयाच्या निकालाकडे लागलं आहे. त्यादृष्टीने सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुढील चार महिन्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. त्याच दृष्टीने बीआरएसपीची विदर्भस्तरीय कार्यकर्ता बैठक रवीभवनमध्ये आयोजित करण्यात आली.

बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील, महीला आघाडी नेत्या विश्रांती झांबरे, भुपेन रायपुरे, नागपूर शहर समन्वय समितीचे प्रमुख डॉ. विनोद रंगारी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. सुरेश माने यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन महिने कुठलेही मोठे कार्यक्रम न घेता पक्ष संघटना बांधणी यावरच लक्ष देण्याचे निर्देश दिले. सदस्य नोंदणीनंतरच जिल्हा व विदर्भस्तरीय पदाधिकारी नियुक्त केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्यासाठी या संस्थामधील ओबीसीचे आरक्षण निश्चित करावे.

त्यासाठी जलदगतीने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेचा पाठपुरावा करावा. शासनाने ओबीसी आरक्षण निश्चित करूनच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असे प्रतिपादन डॉ. सुरेश माने यांनी येथे केले. येत्या २६ जानेवारीला ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन देशभर साजरा केला जाईल. यानिमित्ताने येत्या एप्रिल महिन्यात बीआरएसपीतर्फे विदर्भस्तरीय संविधान महापरिषद आयोजित केली जाणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या परिषदेत किमान दहा हजार लोक सहभागी होतील, असे नियोजन असल्याचे या बैठकीत जाहीर करण्यात आले.