Autorikshwa drivers warn of protest against e-bike taxis : राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा; रोजगारावर गंडांतर येणार असल्याचा दावा
Nagpur राज्यात एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. मात्र, ऑटोचालक चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती या निर्णयाच्या विरोधात आक्रमक झाली आहे. या निर्णयामुळे रिक्षाचालकांच्या रोजगारावर गंडांतर येणार असल्याचा दावा करत सरकारला राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यात ‘ई-बाईक टॅक्सी’ सेवेला दिलेल्या परवानगीविरोधात ऑटोरिक्षाचालक आक्रमक झाले आहे. या भूमिकेविरोधात जोरदार आंदोलन करण्याचा इशारा दिला असून यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हे आहेत. मंत्र्यांनी लवकरात लवकर याकडे लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली आहे.
सरकारने २५ जून २०२५ पर्यंत हे धोरण रद्द करावे, असे समितीने म्हटले आहे. जर सरकारने त्यांची मागणी मान्य केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील १८ लाख ऑटोरिक्षा चालक देशोधडीला लागतील, त्याचे गंभीर परिणाम भविष्यात सरकारला भोगावे लागतील, तेव्हा सरकारने ऑटोरिक्षा चालकांचा अंत पाहू नये, असा इशारा ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीकडून देण्यात आला आहे.
या निर्णयाला विरोध करण्यासाठी ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्रने राज्यभरात एकदिवसीय धरणे आंदोलनदेखील पुकारले होते. ई-बाईक टॅक्सीला दिलेली परवानगी सरकारने रद्द करावी या मागणीसाठी ऑटोरिक्षाचालकांमध्ये स्वाक्षरी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व ऑटोरिक्षाचालकांचे स्वाक्षरी केलेले निवेदन सरकारला १५ जूनदरम्यान देण्यात येईल.
MLC Sandip Joshi : संजय राठोड यांच्या विभागावर भाजप आमदाराचा आरोप!
नागपुरात टायगर ऑटोरिक्षा संघटनेतर्फे संविधान चौक येथे आंदोलन करण्यात आले. याचे नेतृत्व विलास भालेकर, टायगर ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष जावेद शेख, अतिश शेंडे, राजू इंगळे, नरेंद्र वाघमारे, सुमित भालेकर, वैभव कांबळे यांनी केले.