Congress’s Elgar against Modi government’s actions : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; निवेदन सादर
Amravati केंद्र सरकारच्या सूडबुद्धीने व द्वेषपूर्ण कारवाईचा निषेध करत शुक्रवारी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांना केंद्र शासनाच्या कारभाराविरोधात निवेदनही सादर करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, खासदार बळवंत वानखेडे आणि शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. मोदी शासनाने ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राची मालमत्ता मनमानी पद्धतीने जप्त केली असून, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व इतर ज्येष्ठ नेत्यांविरोधात सूडबुद्धीने चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. हे कृत्य म्हणजे लोकशाही परंपरेवर आघात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
ED notice to Sonia and Rahul Gandhi : पंतप्रधानांकडून सत्तेचा गैरवापर, काँग्रेसचा आरोप!
या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा व शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत त्यांनी केंद्र शासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेस नेते मिलिंद चिमोटे, हरिभाऊ मोहोड, सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, मुकद्दर खा पठाण, नामदेवराव तनपुरे, किशोर देशमुख आदींची उपस्थिती होती.
तर आंदोलन अधिक तीव्र करणार
“केंद्र शासनाने अलीकडे हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू केला आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असून त्यांच्या विरोधात सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. हा प्रकार न थांबल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असे अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले.