Teachers appointed after students kept schools shut : शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे पालक आक्रमक, पंचायत समितीतच भरली शाळा
Buldhana “शिक्षक द्या… शिक्षक या…” अशा घोषणा देत मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी २ सप्टेंबरपासून शाळा बंद आंदोलन छेडले होते. अखेर पालकांच्या आक्रमक भूमिकेसमोर शिक्षण विभाग झुकला आणि दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. या आंदोलनामुळे शिक्षण विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. एका बाजूला जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटत चालली आहे, तर दुसऱ्या बाजूला ज्या शाळांमध्ये विद्यार्थी वाढत आहेत त्या शाळांकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला.
बेलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून तब्बल १८१ विद्यार्थी शिकत आहेत. शाळेसाठी सात शिक्षकांची पदे मंजूर असतानाही केवळ पाचच शिक्षक कार्यरत होते. उर्वरित दोन शिक्षकांची तातडीची गरज वारंवार निदर्शनास आणूनही शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे पालकांनी संतापून २ सप्टेंबरपासून शाळा बंद ठेवत विद्यार्थ्यांना वर्गात पाठविण्यास नकार दिला.
४ सप्टेंबर रोजी पालक व विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला निवेदन देऊन पंचायत समितीकडे मोर्चा वळविला. ‘शिक्षण आमच्या हक्काचे आहे’ अशा घोषणांनी गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनातच शाळा भरविण्यात आली. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे गटशिक्षणाधिकारी विलास पाटील यांना पंचायत समितीत हजर राहावे लागले. अखेर त्यांनी पालकांचा रोष शांत करत दोन शिक्षकांची नियुक्ती केली.
“आम्ही आमची मुले जिल्हा परिषद शाळेत घालून गुन्हा केला का?” असा संतप्त सवाल पालकांनी करत शिक्षण विभागाला धारेवर धरले. या आंदोलनावेळी सर्व १८१ विद्यार्थी, पालक व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.