Girl denied entry because she is Muslim, case registered against secretary and teacher in Nagpur : अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिले होते चौकशीचे आदेश
Nagpur : केवळ मुस्लीम आहे म्हणून एका विद्यार्थीनीला शाळेत प्रवेश नाकारण्यात आला. याची तक्रार मुलीच्या पालकांनी अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्याकडे केली होती. त्यांनी तात्काळ दखल घेऊन शिक्षण आणि महिला व बाल विकास विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत तक्रार खरी निघाली. त्यामुळे नागपुरातील जरीपटका पोलिस स्टेशनमध्ये दयानंद आर्य विद्यालयाचे सचिव राजेश लालवानी व शिक्षिका सिमरन ज्ञानचंदानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका गीता हरवानी यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यावरून सचिव राजेश लालवानी व शिक्षिका सिमरन ज्ञानचंदानी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९९ नुसार (जाणुनबूजून दृष्ट हेतूने धार्मिक श्रद्धांचा अपमान करणे, धार्मिक भावना दुखावणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्यारे खान यांनी दिलेल्या आदेशानंतर करण्यात आलेल्या चौकशीत हा प्रकार धर्माच्या आधारावर केलेला भेदभाव असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे सदर कारवाई करण्यात आली.
Uddhav Thackeray Shiv Sena : ठाकरेंचा नेता भाजपमध्ये, बुलढाण्यात धक्का!
शाळेबद्दल सांगताना मुख्याध्यापिका गीता हरवानी यांनी लालवानी यांचे धर्मविरोधी विचार, शिक्षकांवर टाकलेला दबाव, तसेच भेदभाव करणाऱ्या धोरणांचा निषेध केला आणि आयोगाकडे तक्रार दाखल केली. आयोगाने तक्रारीची सत्यता पडताळून चौकशीचे आदेश दिले. दोघांवर गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील तपास जरीपटका पोलीस करत आहेत.
विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये. अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थांमध्ये जर अशा प्रकारचा कारभार सुरू असेल तर राज्य अल्पसंख्याक आयोग ते खपवून घेणार नाही, असा इशारा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिला आहे. शिक्षण सर्वांसाठी आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये कुठल्याही भेदभावाला थारा नसावा, असेही त्यांनी म्हटले आहे.