DCM Eknath Shinde’s initiative has helped in resolving the issue of salaries of ST employees : एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सोडवण्यात यश
Mumbai : एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44 टक्के पगार येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन लवकरच अदा करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे फक्त 56 टक्के वेतन मिळाल्याचे वृत्त पसरल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. काल (१० एप्रिल) सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांची काही एसटी कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपले उर्वरित वेतन लवकरच देण्याची मागणी केली होती.
कर्मचाऱ्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन या प्रश्नावर शिंदे यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत अदा करण्यात येईल असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्यावरील वेतन कपातीचे संकट दूर होण्यास मदत झाली आहे.
एस.टी. कर्मचाऱ्यांचे वेतन कपात केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. उन्हाळ्यात प्रवाशांची संख्या वाढते. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले तर लालपरीची चाके थांबण्याची भीती होती. दुसरीकडे विरोधी पक्षांनी सरकारवर टिकेची झोड उठवली होती. या विषयाचा भडका उडण्याआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशस्वीपणे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या पगारावर तोडगा काढला. त्यामुळे कर्मचारी आनंदात आहेत, तर विरोधकांची तोंडे बंद झाली आहेत. *