Breaking

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर !

Meeting with MPs, discussions with NDA leaders : खासदारांसोबत बैठक, एनडीए नेत्यांशी होणार चर्चा

Mumbai : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. याशिवाय, एनडीएतील वरिष्ठ नेत्यांसोबतही ते विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.

संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू झाले असून 21 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या कालावधीत एकूण 21 बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतरचे हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे राजकीय हालचालींना विशेष गती मिळालेली दिसून येते. विरोधकही विविध मुद्यांवर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Happy Birthday Sudhir Mungantiwar : राजकारणातील स्पष्टवक्ते व्यक्तिमत्व – सुधीरभाऊ

एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत माहिती देताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, “शिंदे हे प्रत्येक अधिवेशनात आपल्या खासदारांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी दिल्लीला जातात. खासदारांच्या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होणार असून, हे प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे केंद्रातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत.”

शिवसेना शिंदे गटातील काही खासदारांनी आपल्या मतदारसंघात विकासकामे, निधी वितरण, शासकीय मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या केंद्रस्तरीय निर्णयांबाबत आपली मागणी मांडली होती. हे सर्व मुद्दे शिंदे केंद्र सरकारकडे मांडणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी अलीकडेच शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, “जाधव यांचे कार्यकर्ते आमच्या पक्षात आले, पण त्यांनी कोणतीही टीका न करता प्रवेश केला. जाधव यांनी एक भावनिक पत्र लिहले आहे, त्यामुळे आम्ही त्यावर काही भाष्य करणार नाही. मात्र, या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, जाधव यांचे त्यांच्या पक्षात खच्चीकरण होत होते. म्हणूनच त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या जवळ असलेल्या पक्षाचा पर्याय निवडला.

Maharashtra Politics : कदम-परब भेटी मुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण !

एकूणच, एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा केवळ शिवसेना शिंदे गटापुरता मर्यादित न राहता एनडीएतील संवाद व राजकीय गणितांसाठीही महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या दौऱ्याकडे राजकीय जाणकार लक्ष ठेवून आहेत.