Delay in second installment of Gharkul scheme : बीडीओंवर हल्लाबोल; घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्यास विलंब
Amravati घरकुल योजनांचा दुसरा हप्ता विविध कारणे पुढे करून रोखला जात असल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत. या प्रकारावर शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी सोमवारी दर्यापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना (BDO) धारेवर धरत तीव्र शब्दांत जाब विचारला. तसेच लाभार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडवल्या नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांना उलटे टांगण्याची धमकीही दिली.
शिवसेना पदाधिकारी आणि लाभार्थ्यांचा आक्रमक पवित्रा पाहता पंचायत समितीतील अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ कामाला लागले. परिणामी, काही तासांतच लाभार्थ्यांच्या खात्यावर दुसरा हप्ता जमा करण्यात आला.
केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयानुसार तालुक्यातील सर्वच गावांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, शबरी आवास योजना अशा विविध योजनांतर्गत घरकुलांचे काम सुरू आहे. या योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया पंचायत समितीमार्फत राबवली जात आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांची बँक खाती आधार कार्डाशी संलग्न नसल्यामुळे त्यांना अनुदान वितरणात विलंब होत आहे.
याच दरम्यान, शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोरच काही लाभार्थ्यांच्या खात्यात हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आली. सध्या टप्प्याटप्प्याने अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू असून, लाभार्थ्यांनी कोणतीही अडचण असल्यास थेट पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन गटविकास अधिकारी कालीदास तापी यांनी केले आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण करू नये.
100 Days Program : अकोल्याचे मृद व जलसंधारण कार्यालय राज्यात प्रथम
“गावखेड्यांतील गोरगरीब, अपंग लाभार्थी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीच्या अनेक फेऱ्या मारत आहेत. मात्र, घरकुल विभागातील काही कंत्राटी अधिकारी व कर्मचारी लाभार्थ्यांकडून हप्ते मंजूर करण्यासाठी पैसे घेत आहेत. हा प्रकार संतापजनक असून, या गंभीर प्रकाराकडे बीडीओ दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे,” अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी केली.