internal competition in sanjay gaikwad and prataprao jadhao : ‘एंट्री पॉलिटिक्स’ने जिल्ह्यात तापले वातावरण; कोणाचा वरचष्मा ठरणार?
Buldhana जिल्ह्यात सध्या शिंदेसेनेच्या पक्षप्रवेश राजकारणाची चांगलीच लगबग सुरू असून संघटन विस्तारासाठी दोन्ही प्रमुख गट मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे आमदार संजय गायकवाड गावोगावी फिरत कार्यकर्त्यांना पक्षात आणण्यासाठी मोहीम राबवत आहेत, तर दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही प्रवेश मेळाव्यांच्या माध्यमातून जिल्हाभर सक्रिय मोर्चेबांधणी सुरू केली आहे.यामुळे कोण जास्त कार्यकर्ते पक्षात आणतो आणि कोणाचा प्रभाव जिल्ह्यात अधिक ठसतो, याची एक प्रकारची अदृश्य स्पर्धा सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
गेल्या वर्षभरात आमदार गायकवाड यांनी मोताळा, बुलढाणा ते थेट मुंबईपर्यंत पक्षप्रवेश सोहळ्यांचा सपाटा लावला आहे. स्थानिक पातळीवरील नाराज कार्यकर्ते, इतर पक्षांतील पदाधिकारी आणि युवा चेहऱ्यांना पक्षात आणण्यावर त्यांनी विशेष भर दिल्याचे दिसून येते. दुसरीकडे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही जिल्हाभर स्वतंत्र प्रवेश मोहीम सुरू करत एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर प्रवेश मेळावे आयोजित करण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील *‘एंट्री पॉलिटिक्स’*चे तापमान अधिक वाढले आहे.
khairav-barlinga grampanchayat : एका मताने निवडून आलेल्या सरपंचांना धक्का; सदस्यांचे बहुमताने बंड
वरून पाहता ही चढाओढ संघटनात्मक बळकटीची सकारात्मक स्पर्धा वाटत असली, तरी राजकीय वर्तुळातील चर्चांमध्ये काही वेगळेच संकेत मिळत आहेत. ही केवळ पक्षवाढीसाठीची आरोग्यदायी स्पर्धा आहे की शांतपणे सुरू असलेला आतील गटसंघर्ष, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्ही गट आपापल्या पद्धतीने ताकद दाखवत असले तरी जिल्ह्यातील खऱ्या अर्थाने वरचष्मा कोणाचा ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि संघटनात्मक नियुक्त्यांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेश राजकारणाचे परिणाम अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तथापि, काही राजकीय जाणकारांचे मत यापेक्षा वेगळे आहे. त्यांच्या मते, ही स्पर्धा नसून संघटन वाढवण्यासाठी आखलेली नवी रणनीती आहे. राजकारणात जे वरून दिसते तेच अंतिम सत्य असतेच असे नाही, हेही तेवढेच खरे असल्याची चर्चा आहे.








