Will you take MNSs support Eknath Shindes clear answer in one sentence : मनसेचा पाठिंबा घेणार का? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंचं एका वाक्यात स्पष्ट उत्तर
Mumbai : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडीवरून राजकीय हालचालींना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेच्या भूमिकेबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. मुंबईतही मनसेचा पाठिंबा घेणार का, असा थेट प्रश्न विचारण्यात आल्यानंतर जर आणि तरवर बोलण्यापेक्षा सध्याची परिस्थिती काय आहे, त्यावर बोला, असं म्हणत शिंदेंनी चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार, असा ठाम दावा त्यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेत बहुमताचा ११४ चा आकडा कोणत्याही एकट्या पक्षाला गाठता आलेला नाही. भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गटाकडे २९, उद्धव ठाकरे गटाकडे ६५ आणि मनसेकडे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. या अंकगणितामुळे मनसेची भूमिका निर्णायक ठरणार का, यावर चर्चा सुरू असतानाच कल्याण-डोंबिवली महापालिकेतील घडामोडींमुळे या चर्चेला अधिक हवा मिळाली आहे.
Harshvardhan Sapkal : फडणवीस सर्वात निष्क्रीय, अकार्यक्षम व बेजबाबदार मुख्यमंत्री
कल्याण-डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला सोडून मनसेचे नगरसेवक शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत गेल्याने आता मुंबईतही मनसे तसाच कित्ता गिरवणार का, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं, असं सावध विधान केल्याने चर्चांना अधिक बळ मिळालं होतं. मात्र या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी थेट भूमिका मांडत महायुतीची सत्ता निश्चित असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, मुंबईत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेऊन सत्तास्थापनेचा दावा करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. भाजप-शिवसेना शिंदे गटामध्ये महापालिकेतील महत्त्वाच्या पदांबाबत अंतिम वाटाघाटी जवळपास पूर्ण झाल्याचे बोलले जात आहे. यामध्ये महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपदावरून चर्चा सुरू असून महापौरपद भाजपकडे गेल्यास शिंदे गटाला स्थायी समिती अध्यक्षपद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Chandrashekhar Bawankule : नागपूरचा महापौर भाजप ठरवेल, वडेट्टीवार नव्हे!
या संभाव्य सत्तावाटपानुसार भाजपकडे सुधार समिती, बेस्ट आणि आरोग्य समिती राहण्याची शक्यता आहे, तर शिंदे गटाला शिक्षण, विधी, बाजार आणि उद्यान समित्यांची जबाबदारी मिळू शकते. मात्र या सर्व घडामोडींमध्ये मनसेला सोबत घेत युतीची बेरीज वाढवली जाणार की केवळ भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या जोरावर सत्ता स्थापन होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
मुंबई महापालिकेच्या अंतिम निकालानुसार भाजप ८९, शिवसेना ठाकरे गट ६५, शिवसेना शिंदे गट २९, काँग्रेस २४, मनसे ६, एमआयएम ८, तर इतर पक्षांकडे मिळून उर्वरित जागा आहेत. या राजकीय अंकगणिताच्या पार्श्वभूमीवर महापौरपद कोणाच्या गळ्यात पडणार आणि मनसेची भूमिका काय असणार, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
___








