Eknadh Shinde donates Rs 5 lakh to Syed Adil’s family : सैय्यद आदिलच्या कुटुंबीयांना एकनाध शिंदेंची ५ लाखांची मदत !
Nagpur : जम्मू – काश्मीरमधील पहेलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २८ पर्यटक ठार झाले. हल्ला होत असताना एक शुरवीर काश्मीरी २० वर्षाचा युवक सैय्यद आदिल हुसैन शाह याने माणूसकी दाखवली. गोळ्या झाडत असलेल्यांपैकी एका दहशतवाद्याच्या हातातून त्याने रायफल हिसकावून घेतली. या प्रयत्नात गोळी लागल्याने सैय्यद आदिलचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सैय्यद आदिलच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून ५ लाख रुपयांचा धनादेश दिला. पहलगाम येथे मदतकार्यासाठी गेलेले शिवसैनिक आणि सरहद्द संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा धनादेश काल (२५ एप्रिल) सैय्यदच्या कुटुंबीयांना देण्यात आला. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
Jammu Kashmir terrorist attack : काश्मीरचं सौंदर्य घायाळ करणारं, पण आता ‘घायाळ’ व्हायला जाणार कोण ?
सैय्यद आदिलच्या भावाने हल्ल्याच्या दिवशी घडलेला घटनाक्रम एकनाथ शिंदे यांना सांगितला. पर्यटकांना वाचवण्यासाठी सैय्यद आदिलने एका दहशतवाद्याच्या हातातील रायफल खेचली. त्याचवेळी दुसऱ्या दहशतवाद्याने आदिलला गोळ्या घातल्याचे त्याच्या भावाने सांगितले. यावेळी त्याच्या डोळ्यांतून अश्रुंच्या धारा थांबत नव्हत्या.
अवघ्या २० वर्षांचा सैय्यद पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरून फिरवण्याचे काम करायचा. त्याच्या घोड्यावरून जो प्रवासी सफर करत होता, त्याला वाचवण्याचा प्रयत्न सैय्यदने केला. दहशतवादी समोर आल्यानंतर धाडस दाखवत त्याने त्या दहशतवाद्याशी दोन हात केले. पण निशस्त्र असलेल्या सैय्यदवर दहशतवाद्यांनी गोळी झाडली. यात त्याचा मृत्यू झाला. गेलेला जीव परत येणे शक्य नाही. ५ लाख रुपये ही जिवाची किंमत असू शकत नाही. पण त्याच्या कुटुंबीयांना आधार मिळावा म्हणून ही मदत केल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
Jammu – Kashmir Attack : नागपुरातील दोनशेवर पर्यटक अद्यापही अडकून, पण सुरक्षीत !
सैय्यत आदिलने शौर्याचा परिचय देत माणुसकीचे अनोखे उदाहरण जगाला दाखवून दिले आहे. त्याचे बलीदान वाया जाणार नाही, असे म्हणत शिंदे यांनी त्याच्या कुटुंबीायांचे सांत्वन केले आणि त्याचे मोडकळीस आलेले घर नव्याने बांधून देण्यासाठीही मदत करू, अशी ग्वाही आदिलच्या कुटुंबीयांना दिली.