Eknath Shinde pierced the ears of the opposition : औरंग्याचे उदात्तीकरण कुणी केलं, याच्या मुळाशी सरकार जाणारच आहे
Mumbai : औरंग्याचं समर्थन करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमानच आहे. आम्ही कोणत्याही जाती, धर्माच्या विरोधात नाही. पण ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचा ४० दिवस अनन्वीत छळ केला, औरंग्याचे समर्थन करणारा आम्हाला चालणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगजेब समर्थकांना इशारा दिला. खरं तर एक सच्चा देशभक्त मुसलमानही कधीच औरंग्याचं समर्थन करणार नाही, असंही ते म्हणाले.
काल (१७ मार्च) नागपुरात झालेल्या दंगलसदृष्य घटनेनंतर आज (१८ मार्च) देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात निवेदन केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रात औरंग्याचे उदात्तीकरण कुणी सुरू केलं, कशासाठी केलं, याच्या मुळाशी सरकार जाणारच आहे. औरंगजेब हा चांगला प्रशासक होता. त्याची तुलना अबु आजमींनी शिवाजी महाराजांसोबत केली होती. तेव्हा त्यांना समज देण्यात आली होती. परंतु पुन्हा त्यांनी तोच प्रकार केला. म्हणून आज ते बाहेर आहेत. आता बाहेरही काही कारभार केला, तर तो बाहेरही फिरू शकणार नाही, असा सज्जड दम शिंदे यांनी दिला.
औरंगजेब आपला संत होता का की कुणाचा सगा सोयरा होता, असा प्रश्न करत औरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, असे शिंदे म्हणाले. काल नागपुरात औरंग्याच्या विरोधात आंदोलन झालं. त्यानंतर पोलिस तेथे आले. पोलिसांनी दोन्ही समाजांच्या लोकांना समजावून शांतता प्रस्थापित केली. पोलिस स्टेशनमध्ये तक्रार घेण्यासाठी त्यांना चर्चा करायला बोलावले. त्यानंतर रात्री जमाव दंगल करतोच कशी, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
Eknath Shinde : खुर्चीच्या मोहासाठी कोणतीही तडजोड करणार नाही
औरंग्याच्या विरोधात आंदोलन झालं, तर त्याचं प्रत्युत्तर आंदोलन करूनच दिलं पाहिजे. तोडफोड, जाळपोळ ही काय उत्तर देण्याची पद्धत आहे काय? यादरम्यान जमावातील लोकांनी हॉस्पीटलमधील देवांचे फोटोही काढून फेकले. हे अतिशय गंभीर आहे. जेथे रोज १०० ते १५० बाईक पार्क केल्या जातात. तेथे काल एकही बाईक नव्हती. त्यामुळे कालची घटना म्हणजे पूर्वनियोजित कट होता, असे एकनाथ शिंदे म्हणाले.