Election Commission : मतदार ओळखपत्र देण्यात हलगर्जीपणा, दिवाळीचे कारण

Negligence in Distribution of Voter ID Cards : ओळखपत्रे पडूनच; मतदारांपैकी अनेक बाहेरगावी, मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता

Dongao मेहकर निवडणूक विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मतदार यादीच्या प्रारूप प्रसिद्धीपूर्वी तिची पडताळणी न करता ती थेट प्रसिद्ध करण्यात आली, तर दुसरीकडे मतदार ओळखपत्रे वेळेवर मतदारांपर्यंत पोहोचवण्यातही विभागाने प्रचंड हलगर्जीपणा दाखवला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २६ सप्टेंबर रोजीच हजारो मतदार ओळखपत्रे मेहकर तहसील कार्यालयात आली होती. ही ओळखपत्रे संबंधित मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी तत्काळ पोस्टात देणे आवश्यक होते. मात्र, निवडणूक विभागाने तब्बल २० ते २५ दिवसानंतर ही ओळखपत्रे पोस्टात जमा केली. तोपर्यंत दिवाळीच्या सुट्या संपल्याने अनेक मतदार बाहेरगावी निघून गेले होते. परिणामी अनेकांना ओळखपत्रे वेळेवर न मिळण्याची शक्यता आहे.

Water crisis : मलकापुरात १५ दिवसाआड पाणीपुरठा, नागरिक संतापले

लोकशाहीचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणुकीत मतदार हा ‘राजा’ मानला जातो. मतदाराची ओळख निश्चित करण्यासाठीच निवडणूक विभागाकडून मतदार ओळखपत्रे दिली जातात. मात्र, विभागानेच वेळेवर जबाबदारी पार न पाडल्याने अनेक नव्या मतदारांना मतदानाची संधी गमवावी लागू शकते.

नवीन नोंदणी केलेले अनेक मतदार विद्यार्थी किंवा नोकरदार असल्याने ते दिवाळीला गावी आले होते. जर निवडणूक विभागाने त्या काळातच ओळखपत्रे दिली असती, तर त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांची माहिती आणि सहभागाची प्रेरणा मिळाली असती. परंतु, उशिरामुळे आता अनेक मतदार मतदानापासून वंचित राहतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Local Body Elections : अकोल्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का

“निवडणूक विभागात कर्मचारी कमी असल्यामुळे मतदार ओळखपत्रांची नोंद घेऊन पोस्टात देण्यास विलंब झाला. तरीही मतदार ओळखपत्र मतदारांपर्यंत तत्काळ पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे सुरेंद्र कावळे, नायब तहसीलदार (निवडणूक), मेहकर यांनी स्पष्ट केले.

मात्र, नागरिकांचे म्हणणे आहे की निवडणुकीपूर्व कामकाजातील ही ढिसाळ पद्धत लोकशाहीच्या मूलभूत प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, विभागाने यापुढे जबाबदारीने आणि पारदर्शकतेने काम करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.