Wardha Municipality Employees not punctual : कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेचा विसर
Wardha शहरातील नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्या. त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे. याकरिता शहरात नगरपालिकेची प्रशस्त इमारत उभारण्यात आली. या इमारतीला ‘रायगड’ नाव देण्यात आले. पण, प्रशासक असल्याने मनमर्जी काम सुरू आहे. गुरुवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेचाही विसर पडल्याने वर्ध्यातील ‘रायगडाला जाग येते तेव्हा.. येथील कामकाजाला सुरुवात होते’, असे म्हणण्याची वेळ आली.
नगरपालिकेच्या या प्रशस्त इमारतीमध्ये तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर विविध विभाग आहेत. शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतही बदल केले आहे. सकाळी ९ : ४५ वाजता ते सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत कार्यालयाची वेळ आहे. यामध्ये सोयीनुसार एक तासांचा भोजन अवकाशही देण्यात आला आहे. पण, नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुरुवारी या वेळेचा विसर पडल्याचे पाहायला मिळाले.
सकाळी पावणेअकरा वाजेपर्यंत बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्याच होत्या. तळमजल्यावरील जन्म-मृत्यू नोंद व कर भरणा केंद्रात कुणीही नव्हते. मात्र, नागरिक आपापल्या कामाकरिता वेळत कार्यालयात उपस्थित झाले होते. सकाळी ९:४५ वाजता कार्यालय सुरू झाल्यानंतर साधारणत: १० वाजेपर्यंत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात पोहोचणे अपेक्षित आहे. पण, गुरुवारी सकाळी पावणे अकरा वाजेपर्यंत पालिकेत बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी उपस्थित होते.
कार्यालयाची साफसफाई करणारे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत होते. सध्या पदाधिकारी नसल्याने कर्मचारी व अधिकारी मनमर्जीने काम करीत असल्याचे कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी यावेळी बोलून दाखविले. त्यामुळे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेची शिस्त लावण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
बॅग टेबलवर ठेवून फोन कानाला
कार्यालयातील तळ मजल्यावर सकाळी पावणे अकरा वाजता साफ-सफाई सुरू होती. प्रत्येक विभागाच्या कार्यालयात डोकावल्यावर कुठे रिकाम्या खुर्च्यांना लाईट प्रकाश देत होता, तर पंखा हवा घालताना दिसून आला. कुठे मोजकेच कर्मचारी नुकतेच पोहोचले होते. काही आल्याआल्याच कामाला लागले, तर कुणी टेबलावर बॅग ठेवून बाहेर फोनवर बोलतांना दिसून आले.