Mahavitaran’s proposed tariff hike will burden consumers : माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा तीव्र विरोध; सुनावणीवेळी ग्राहकांची बाजू मांडली
Amravati महावितरणने सर्वसामान्य नागरिकांवर बोजा टाकणारी नवीन वीज दरवाढ प्रस्तावित केली आहे. सौर ऊर्जा ग्राहकांनाही विविध अटी लावून अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रस्तावित दरवाढीविरोधात राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या सुनावणीदरम्यान तीव्र विरोध नोंदवला.
अमरावती येथे सोमवारी महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमक्ष दाखल हरकती व सूचनांवर प्रत्यक्ष सुनावणी झाली. डॉ. सुनील देशमुख यांनी लेखी हरकत दाखल करून प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहिले. त्यांनी वीज दरवाढीला तसेच सौर ऊर्जा ग्राहकांवर लादण्यात येणाऱ्या नव्या अटींना जोरदार विरोध केला.
महाराष्ट्रभरातून ८ हजारांहून अधिक वैयक्तिक वीज ग्राहक, विविध ग्राहक संघटना आणि स्पिनिंग मिल्स संस्थांनी लेखी स्वरूपात हरकती नोंदवल्या आहेत. विभागीय स्तरावर विविध ठिकाणी या हरकतींची सुनावणी सुरू आहे. नवीन वीज दरवाढ १ एप्रिलपासून लागू होऊ शकते. सौर ऊर्जेच्या माध्यमातून तसेच सौर प्रकल्पांद्वारे २००० मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. महावितरणला ती अवघ्या ३ रुपये प्रति युनिट दराने मिळते.
Harshawardhan Sapkal : काँग्रेसच्या दबावामुळे माधवी पुरी बूचविरोधात गुन्हा!
महावितरणच्या खरेदी खर्चात मोठी बचत होत असतानाही ग्राहकांवर वीज दरवाढीचा बोजा टाकण्याचा हा निर्णय अन्यायकारक आहे, असे मत डॉ. सुनील देशमुख यांनी व्यक्त केले. डॉ. देशमुख यांनी वीज नियामक आयोगाकडे महावितरणचा वीज दरवाढ प्रस्ताव तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, ही दरवाढ रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा, अशीही त्यांची मागणी आहे.