Accident in Jammu and Kashmir while on tour : पर्यटनाला गेले असताना गुलमर्गला अपघात
Nagpur जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले माजी आमदार प्रकाश गजभिये हे बर्फावरून पाय घसरून खाली पडल्याने जखमी झाले. त्यांच्यावर श्रीनगरमध्येच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या अपघाताच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेण्यास सुरुवात झाली.
राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश गजभिये हे राजकारण व समाजकारणातील सक्रिय नाव आहे. एरवी सातत्याने व्यस्त असलेले गजभिये हे वेळात वेळ काढून पत्नी, मुलगा व मुलीसह श्रीनगरला गेले होते. २४ जानेवारी रोजी गुलमर्ग गंडोला येथे त्यांचा अपघात झाला. येथे बर्फावरून पाय घसरून पायरीवर पडले व डोक्याला जबर जखम झाली.
DPC Meeting : पालकमंत्र्यांची नियुक्ती लांबली; विकासकामे रखडली!
त्यांना चक्कर येऊ लागल्याने श्रीनगरच्या शेरे कश्मीर या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे शस्त्रक्रिया करण्यात आली. ते व्हेंटिलेटरवर होते. दरम्यान, मंगळवारी त्यांची प्रकृती खूप खालावली होती. त्यांच्या कुटुंबियांनी नागपुरात आमदार विकास ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी गजभिये यांना एअरलिफ्ट करून मुंबई येथे उपचारासाठी हलविण्याची तयारी केली.
मात्र, डॉक्टरांची परवानगी मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी संपर्क साधला. गजभिये यांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याची सूचना केली. मात्र, बुधवारी सकाळी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले. त्यांनी कुटुंबियांशी काही मिनिटे संवादही साधला. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून पूर्ण लक्ष देण्यात येत असून ते बरे असल्याची खात्री झाल्यावरच त्यांना सुटी देण्यात येईल.
विचारपूस करणाऱ्यांचे फोन
दरम्यान, प्रकाश गजभिये यांच्या प्रकृतीची विचारपूस करणारे फोन महाराष्ट्रभरातून येत आहेत. त्यांचे कुटुंबीय मोबाईलवरून माहिती देत आहेत. त्यांना बरं वाटल्यानंतरच रुग्णालयातून सुटी मिळणार आहे. त्यामुळे सध्या तरी आणखी काही दिवस त्यांचा श्रीनगरमध्येच मुक्काम असेल.