Teachers demand to stop the transfer process : प्रक्रिया थांबवा, शिक्षक संघटनांची जिल्हा परिषदेला मागणी
Buldhana बदल्यांनंतर लाभ मिळवण्यासाठी काही शिक्षकांकडून बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारींचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे खऱ्या दिव्यांग शिक्षकांवर अन्याय होत आहे. याला कंटाळून आता शिक्षक संघटनांनी एकत्र येत बोगस दिव्यांग शिक्षकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. बदल्यांपूर्वी संबंधित शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांची शारीरिक वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
शिक्षक बदल्यांमध्ये दिव्यांग प्रवर्गात लाभ घेण्यासाठी स्वतःसह पत्नी, पाल्य, आई-वडिलांच्या नावाने दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या शिक्षकांकडे वाहन परवाने असूनही ते दिव्यांग असल्याचा दाखला देतात. एवढेच नव्हे, तर अनेक प्रकरणांमध्ये सेवापुस्तकात कोणतीही नोंद नसताना आयकर सवलती, वाहन भत्ता, तसेच बदल्यांमध्येही विशेष वागणूक घेतली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
Prahar Janshakti : आमदाराच्या स्वीय सहायकाची आंदोलकांना मारहाण!
यामुळे सेवा-ज्येष्ठ शिक्षकांना त्यांच्या योग्य जागांवरून वंचित राहावे लागत असून त्यांना विस्थापित व्हावे लागते, असा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे विभागीय शिक्षण उपसंचालक व जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. त्यास अनुसरून बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेही तत्सम कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिक्षक संघटनांचे स्पष्ट मत आहे की, फक्त मूळ नियुक्ती दिव्यांग प्रवर्गातून झालेल्यांनाच बदल्यांमध्ये प्राधान्य मिळावे. दिव्यांग प्रमाणपत्र धारकांची व त्यांच्या कुटुंबीयांची वैद्यकीय तपासणी केवळ जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथेच व्हावी. नागपूर खंडपीठात प्रलंबित असलेल्या सन २०२३ मधील याचिकेचा निकाल येईपर्यंत संवर्ग-एकच्या बदल्यांवर स्थगिती असावी. कारवाई न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.